मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सर्व नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण
गडचिरोली, दि. १५: संघर्षातून संविधानाकडे, गडचिरोलीत ऐतिहासिक आत्मसमर्पण – माओवादाच्या अंताकडे निर्णायक वाटचाल! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज गडचिरोली येथे ₹६ कोटींचे बक्षीस असणाऱ्या वरिष्ठ माओवादी कमांडर मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ सोनू भूपतीसह इतर ६० माओवादी सदस्यांनी आत्मसमर्पण केले. मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ सोनू भूपती, ४० वर्षांपासून माओवादी चळवळीत सक्रीय असलेल्या पॉलिट ब्युरो सेंट्रल कमिटीचे सदस्य असून यांच्यासह ६० वरिष्ठ माओवादी सदस्यांनी शस्त्रांसह आत्मसमर्पण करणे हे ऐतिहासिक आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री यांनी गडचिरोली पोलीस व C६० जवानांच्या कार्याचे विशेष अभिनंदन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘ट्वीन स्ट्रॅटेजी’ (विकास आणि कारवाई) अंतर्गत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील बृहद् रणनितीमुळे देशातून माओवादाचे उच्चाटन होत आहे. भूपती यांच्या आत्मसमर्पणाला ऐतिहासिक महत्त्व आहे, कारण ते ४० वर्षांपूर्वी अहेरी व सिरोंचा भागात नवीन ‘दलम’ची सुरुवात करणारे आणि मोहिमेचे म्होरक्या मानले जात होते. गडचिरोली पोलीस आणि C६० जवानांनी अतिशय जहाल केडरला नेस्तनाबूत करण्याचे काम केले. एकीकडे विकास कामांमुळे माओवादाकडे आकर्षित होऊन नवीन भरती बंद झाली आणि दुसरीकडे माओवादाविरुद्धच्या मोहिमांमुळे माओवादाला ओहोटी लागली. माओवाद आता १०० % संपण्याच्या मार्गावर आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यांना उद्देशून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, त्यांनी भारतीय संविधान स्वीकारले आहे. राज्य सरकार आत्मसमर्पित प्रत्येक व्यक्तीचे उचित आणि उत्तम पुनर्वसन केल्याशिवाय थांबणार नाही. जो संविधानाचा आदर करेल, राज्य त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. यापूर्वी आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांचे उत्तम पुनर्वसन झाल्याचा दाखलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिला. गडचिरोलीच्या विकासाच्या संकल्पाचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गडचिरोली हे ‘स्टील मॅग्नेट’ बनत आहे. पुढील ५ ते ७ वर्षांत गडचिरोली व चंद्रपूरच्या भागामध्ये किमान १ लाख स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट आहे. येथील गुंतवणूकदारांसाठी ९५ % रोजगार भूमिपुत्रांना देण्याची अट असेल. गडचिरोलीला देशाचा ‘ग्रीन स्टील हब’ बनवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, गोंडवाना विद्यापीठ, कर्टील युनिव्हर्सिटी आणि लवकरच सुरू होणारे मेडिकल कॉलेज यांमुळे शेवटचा जिल्हा मानले जाणारे गडचिरोली आता महाराष्ट्राचा पहिला जिल्हा होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. गडचिरोलीने माओवादाविरुद्धच्या लढाईचे नेतृत्व केले आहे. यासोबतच उर्वरित माओवाद्यांनी मुख्य प्रवाहात सामील व्हावे, असे आवाहन देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. माओवादाविरुद्ध विविध आघाड्यांवर सुरू असलेल्या या लढाईमुळे संपूर्ण रेड कॉरिडॉर मानला जाणारा प्रदेश माओवादमुक्त होईल हा विश्वास देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार डॉ. मिलींद नरोटे, महाराष्ट्र पोलीस महासंचालक व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
