वादग्रस्त मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट निघालं
मुंबई/नाशिक, दि. १७: सदैव वादात राहिलेले राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरुद्ध अटक वॉरंट निर्गमित झालं आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई वर्षा निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिली. याप्रकरणी कोकाटे यांचा राजीनामा घ्यायचा किंवा नाही हे अजित पवार ठरवतील, असंही मिटकरी यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार योजनेच्या दहा टक्के राखीव कोट्यातून मिळवलेल्या चार सदनिकांच्या घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार कोकाटे, आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयानं काल दोषी ठरवलं होतं.
