मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपच्या रितू तावडे तर उपमहापौर म्हणून शिंदे गटाच्या संजय घाडी यांच्या नावावर शिक्कामोर्तब
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या सत्तासंघर्षाचा सस्पेन्स अखेर संपला असून, मुंबईच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेविका रितू तावडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी आज तावडे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले, तर महायुतीमधील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाकडून संजय शंकर घाडी यांना उपमहापौर पदाची संधी देण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेचे महापौरपद यंदा ‘सर्वसाधारण महिला’ गटासाठी राखीव असल्याने भाजपकडून अनेक नावांची चर्चा सुरू होती, मात्र प्रदीर्घ अनुभव आणि पक्षनिष्ठेच्या जोरावर रितू तावडे यांनी या शर्यतीत बाजी मारली आहे. येत्या ११ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महापौर निवडणुकीत रितू तावडे या मुंबईच्या इतिहासातील भाजपच्या पहिल्या महिला महापौर ठरतील.
महापौरपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर रितू तावडे यांनी अत्यंत विनम्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “महापौर म्हणून माझी निवड झाली असली तरी, मी स्वतःला मुंबईचा एक ‘सेवक’ मानून काम करणार आहे. मुंबईच्या हितासाठी सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी एकत्र येऊन, सभागृहाची प्रतिष्ठा राखून प्रामाणिकपणे काम करावे, अशी माझी मनोमन इच्छा आहे,” असे त्यांनी यावेळी नमूद केले. रितू तावडे यांचा राजकीय प्रवास अत्यंत प्रभावी राहिला आहे. २०१२ मध्ये प्रभाग १२७ मधून त्यांनी प्रथमच पालिकेत पाऊल ठेवले, त्यानंतर २०१७ मध्ये घाटकोपरच्या प्रभाग १२१ आणि २०२५ च्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत प्रभाग १३२ मधून त्यांनी दणदणीत विजय मिळवला. यापूर्वी त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपदही सांभाळले असून, त्या प्रशासकीय कामात चोख मानल्या जातात.
दुसरीकडे, उपमहापौर पदासाठी शिंदे गटाने आपले अनुभवी नेतृत्व संजय शंकर घाडी यांना मैदानात उतरवले आहे. शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी घाडी यांच्या नावाची घोषणा करताना स्पष्ट केले की, घाडी यांचा कार्यकाळ सव्वा वर्षांचा (१५ महिने) असेल. शिंदे गटाने सत्तेच्या वाटपात जास्तीत जास्त नगरसेवकांना संधी मिळावी म्हणून पदांच्या ‘खांडोळी’चा जो पायंडा पाडला आहे, तोच मुंबईतही कायम ठेवला आहे. संजय घाडी हे शिवसेनेचा जुना आणि निष्ठावान चेहरा असून १९८८-८९ पासून ते संघटनेत सक्रिय आहेत. भारतीय विद्यार्थी सेनेचे विभाग प्रमुख, मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य आणि सध्या शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख अशी त्यांची विविधांगी ओळख आहे. त्यांच्या पत्नी संजना घाडी यादेखील शिवसेनेच्या उपनेत्या व प्रवक्त्या असून घाडी कुटुंब राजकीयदृष्ट्या अत्यंत सक्रिय आहे.
मुंबई महापालिकेच्या या नव्या सत्तेच्या समीकरणाने महायुतीचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. रितू तावडे यांच्या रूपाने भाजपला मुंबईत मोठे स्थान मिळाले आहे, तर संजय घाडी यांच्या रूपाने शिवसेनेच्या जुन्या फळीला सन्मान देण्यात आला आहे. आगामी ११ फेब्रुवारीच्या निवडणुकीकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले असून, या निवडीनंतर मुंबईच्या विकासाला नवी गती मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
