परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
मुंबई, दि. २० : या वर्षीच्या डिसेंबर अखेर दहिसर ते काशीमिरा मार्गावर मेट्रो सुरू करण्याचे नियोजन असून मिरा-भाईंदरवासियांसाठी हा एक आनंदाचा क्षण असणार आहे. तब्बल १४ वर्षांच्या पाठपुराव्याला यश येत असून मिरा-भाईंदरवासियांचे स्वप्न पूर्णत्वास येत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. परिवहन मंत्री सरनाईक यांनी दहिसर ते काशीमिरा या मेट्रो मार्गाचा पाहणी दौरा केला, त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्या सोबत ‘महामेट्रो’ चे अधीक्षक अभियंता व त्यांची तंत्रज्ञ सल्लागार कंत्राटदार टीम उपस्थित होती.

मंत्री सरनाईक म्हणाले की, सन २००९ मध्ये जेव्हा या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो, त्यावेळी येथील नागरिकांना मेट्रोचे स्वप्न दाखवले होते. गेल्या १४ वर्षांमध्ये सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश येताना दिसत आहे. २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगर विकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यामुळे दहिसर ते काशीमिरा या मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली. लवकरच हा मार्ग सुरू झाल्यानंतर मीरा-भाईंदरवासीय मेट्रोने अंधेरीपर्यंत जाऊ शकतील. तसेच एअरपोर्ट टी-१ वरून मेट्रो ३ चा वापर करून थेट कुलाब्यापर्यंत देखील जाऊ शकतील.

त्याचबरोबर, नवीन वर्षात मिरा-भाईंदरवासीयांसाठी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक मंत्रालय, विधान भवन येथे जाण्यासाठी मेट्रोची नेटवर्कद्वारे सुविधा उपलब्ध असणार आहे.
डिसेंबर – २०२६ अखेर मेट्रो सुभाषचंद्र बोस मैदानापर्यत..
दहिसर – काशीमिरा मेट्रो डिसेंबर-२०२६ पर्यंत नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत विस्तारित होणार आहे. त्याबरोबरच वसई – विरार मेट्रो लाईनचे काम देखील लवकरच सुरू करण्यात येईल. त्यामुळे वसई – विरारपासून अंधेरी आणि तिथून विमानतळ स्थानक इंटरचेंजने थेट कुलाब्यापर्यंत मेट्रोची सेवा पुढील काही वर्षांमध्ये सुरू होऊ शकते, अशी आशा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केली.
सीएमआरएस प्रमाणपत्र नंतर दहिसर – काशीमिरा मेट्रोला हिरवा कंदील
दहिसर ते काशीमिरा या नव्या मेट्रो मार्गाला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे (सीएमआरएस) प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. ते मिळाल्यानंतर डिसेंबर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या नवीन मेट्रो मार्गाचे लोकार्पण करण्याचे नियोजन करण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिली.
