आमची लढाई दहशतवाद्यांशी; पाकिस्तानच्या लष्कराशी नाही
नवी दिल्ली, दि. १२: पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला, भारताला त्याचा प्रतिकार करणं गरजेचं होतं, त्यामुळे पाकिस्तानच्या नुकसानीसाठी ते स्वतःच जबाबदार आहेत, असं एअर मार्शल ए. के. भारती यांनी म्हटलं. तिन्ही संरक्षण दलांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते आज दुपारी नवी दिल्ली येथे बोलत होते.
भारतीय सशस्त्र दलांनी आज पुन्हा सांगितले की ऑपरेशन सिंदूर फक्त पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यासाठी होते आणि त्यात झालेल्या कोणत्याही नुकसानासाठी इस्लामाबाद जबाबदार आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादविरोधी कारवाई करण्यात आली आणि किमान नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. पाकिस्तानने भारतीय नागरी आणि लष्करी क्षेत्रांवर हवाई हल्ले सुरू करताच, भारतीय सैन्याने प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तानमधील तीन हवाई तळांवर हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये शंभराहून अधिक दहशतवादी आणि ३०-४० पाकिस्तानी लष्करी जवान मारले गेले, असे सैन्याने म्हटले होते. “आमची लढाई दहशतवाद्यांशी आणि त्यांच्या पायाभूत सुविधांशी होती, पाकिस्तानच्या लष्कराशी नाही. म्हणूनच आम्ही ७ मे रोजी फक्त दहशतवादी तळांवर हल्ला केला. हे दुर्दैवी आहे की पाकिस्तानच्या लष्कराने दहशतवाद्यांच्या बाजूने राहण्याचा निर्णय घेतला आणि ती त्यांची स्वतःची लढाई बनविली. म्हणूनच आम्ही प्रत्युत्तर देणं आवश्यक होत. त्यांच्या नुकसानासाठी ते स्वतः जबाबदार आहेत,” असे एअर मार्शल ए. के. भारती यांनी सांगितले.
