येत्या दिवाळीत ‘जीएसटी’ मध्ये सुधारणा करण्याची पंतप्रधान मोदींची लाल किल्ल्यावरून घोषणा
नवी दिल्ली, दि. १५: येत्या दिवाळीत जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर प्रणालीत सुधारणा करण्यात येईल, अशी घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली. एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वज आरोहित केल्यानंतर ते बोलत होते. जीएसटी लागू होऊन आठ वर्षे झाली असून आता या प्रणालीचा फेरआढावा घेण्याची वेळ आली आहे, असं ते म्हणाले. जीएसटी सुधारणा केल्यावर नागरिकांवरचा कराचा भार कमी होईल, लघु उद्योगांना लाभ होईल, तसंच दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील, असं प्रधानमंत्री म्हणाले.
ऑपरेशन सिंदूरमधे कर्तृत्व गाजवणाऱ्या सैनिकांचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी कौतुक केलं. देशाला व्यथित करणाऱ्या पहलगाम हल्ल्याचं प्रत्युत्तर ऑपरेशन सिंदूरद्वारे दिलं, असं प्रधानमंत्री म्हणाले. सरकारने सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं, भारतीय सैनिकांनी पाकिस्तानात शेकडो किलोमीटर घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले, असं ते म्हणाले. भारताने यापुढं दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे, असा इशारा त्यांनी दिला. अण्वस्त्रांच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही, असं मोदी यांनी सांगितलं. तसंच देशाची सुरक्षायंत्रणा मजबूत करण्यासाठी मिशन सुदर्शन ही शक्तिशाली यंत्रणा विकसित करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
२१ वं शतक हे तंत्रज्ञानाचं शतक असून भारत यात वेगानं मार्गक्रमण करत असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. देशाला स्वावलंबी आणि विकसित बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आत्मनिर्भर होण्याची गरज प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली. त्यासाठी प्रत्येक क्षेत्रात आधुनिक परिसंस्था उभारण्याचं काम केलं जात असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. सेमिकंटक्टर क्षेत्रात देश प्रगती करत असल्याचं त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं. आतापर्यंत सहा सेमिकंडक्टर युनिट सज्ज होत असून चार नव्या युनिट्सनाही मान्यता दिल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. यावर्षी अखेर भारतात तयार केलेली चीप बाजारात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अंतराळ संशोधन क्षेत्रात देशाने केलेल्या कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख प्रधानमंत्री मोदी यांनी केला. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय, कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचं त्यांनी अभिनंदन केलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेची महत्त्वपूर्ण घोषणा प्रधानमंत्र्यांनी आजच्या स्वातंत्र्यदिनी केली. सुमारे १ लाख कोटी रुपयांची तरतूद असलेली ही योजना देशभरात आजपासून लागू होईल. या अंतर्गत खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्यांना सरकारकडून १५ हजार रुपये मिळतील असं त्यांनी सांगितलं.
शेतकऱ्यांच्या पशुपालकांच्या मच्छीमारांच्या हिताला तसंच वंचित वर्गाच्या हिताला सरकारचं प्राधान्य आहे, असं मोदी म्हणाले. व्यक्ती निर्माणातून राष्ट्र निर्माणाचं कार्य करणाऱ्या आणि सेवा समर्पण आणि संघटन या संकल्पनेनुसार कार्यरत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला या वर्षी शंभर वर्ष पूर्ण होत आहेत, त्या निमित्तान संघाच्या कार्याला त्यांनी वंदन केलं. लाल किल्ल्यावर आयोजित या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, इतर केंद्रीय मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
Source – AIR
