काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा आणि त्यात पाकिस्तान अथवा इतर कोणत्याच देशाला स्थान नाही: राहुल गांधी
नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीर मधून कलम ३७० व ३५अ हटवल्यानंतर पाकिस्तानची मोठ्या प्रमाणात आगपाखड झाली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला तर अप्रत्यक्ष अणुहल्ल्याची धमकीही दिली. यात काँग्रेसनेही सुरुवातीला मोदी आणि शाह जोडीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. काश्मीर मधील स्थितीबाबत राजकारण करण्याचा प्रयत्नही काँग्रेस कडून झाला. त्यातच कडी म्हणजे राहुल गांधी आणि विरोधीपक्षातल्या नेत्यांचं शिष्टमंडळ काश्मीर मध्ये लोकांच्या भेटीसाठी थेट श्रीनगर विमानताळपर्यंत पोहोचलं होतं.
पण आज अचानक राहुल गांधींनी या प्रश्नी पाकिस्तानला खडे बोल सुनावल्यामुळे सर्वांच्या भुवया वर झाल्या आहेत. काही वेळापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले की, “माझे अनेक मुद्यांवर या सरकारशी मतभेद असतील पण मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा आणि त्यात पाकिस्तान अथवा इतर कोणत्याच देशाला स्थान नाही.”
पुढे आपल्या दुसऱ्या ट्विट मध्ये ते म्हणाले की, “जम्मू आणि काश्मीर मध्ये हिंसा होतेय. तिथे हिंसा आहे कारण ती पाकिस्तान पुरस्कृत आहे जो जगभरात दहशतवादाचा मोठा पाठीराखा देश म्हणून ओळखला जातो.”
राहुल गांधी यांनी अचानक एवढ्या दिवसांनी घेतलेल्या या भूमिकेवर सारेच आश्चर्यचकित झाले असून या वक्तव्याला काही राज्यातील विधानसभा निवडणुका आणि भूमिका स्पष्ट करण्यासाठी पक्षांतर्गत दबाव कारणीभूत असल्याचे कळते.
