कल्याण येथील सम्राट अशोक विद्यालयाचा सलग दहाव्या वर्षी रेकॉर्डब्रेक १०० टक्के निकाल
कल्याण: कल्याण पूर्वेत जुनी व मानांकित शाळा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सम्राट अशोक विद्यालयाने यंदाही दहावीचा निकाल १०० टक्के लावत कल्याण मध्ये आपले एक आगळे वेगळे स्थान निर्माण केले आहे. सम्राट अशोक विद्यालयाने सलग दहा वर्षे दहावीचा निकाल १०० टक्के लावत कल्याण मधील इतर शाळांसाठी एक महत्वपूर्ण आदर्श डोळ्यांसमोर ठेवला आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या आचरणाचे पालन करत पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक विद्यालय आपल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे लक्ष देण्यासाठी शाळेमध्ये विविध कार्यक्रम राबवित असतात . या वर्षीही दहावीचा निकाल १०० टक्के लावून या शाळेेेने आपली निकालाची परंपरा टिकवून ठेवली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च, २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी सम्राट अशोक विद्यालयाचे एकूण ७६ विद्यार्थी परिक्षेला बसलेे होते. २३ विद्यार्थी विशेष प्राविण्य व ३२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून इतर विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी प्राप्त झाली. गुणवत्तेत मुलींनी बाजी मारली असून कु .भाग्यश्री रविन्द्र बारापात्रे ९०.६० % मिळवून प्रथम, पूजा अनिल येंधे ८९.४० % द्वितीय आणि सिद्धी विजय ढमढेरे ८८.४० % मिळवून तृतीय क्रमांकने उत्तीर्ण झाले आहेत.
यंदाच्या वर्षी दहावीचा अभ्यासक्रम बदलेला होता. तोंडी परिक्षेचे गुण रद्द केलेले होते. १००% निकाल लावणे आमच्या समोर आव्हान होते. शेवटी अप्रगत विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षकांना दत्तक देऊन रात्रीचा अभ्यास वर्ग सुरु करुन विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविली. शिक्षकांचे प्रयत्न आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे शाळेचा निकाल १०० % लागला असे शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी सांगितले. तसेच संस्थेचे अध्यक्ष पी. टी . धनवीजय यांनी मुख्याध्यापकांसह शिक्षकांचे विशेष कौतुक केले. मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, नलावडे मॅडम तसेच गणेश पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली सम्राट अशोक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी १०० टक्के निकाल लावत परिसरात जल्लोष पूर्ण वातावरण निर्माण केले आहे. आपल्या शाळेचा निकाल १०० टक्के समजताच विद्यार्थ्यांनी शाळेत पेढे वाटून आनंद साजरा केला आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबत त्यांच्या व्यक्तिमत्वाचा देखील विकास व्हावा यासाठी सम्राट अशोक विद्यालयातील शिक्षक वर्षभर विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवत असतात. सम्राट अशोक विद्यालयातील अनेक माजी विद्यार्थी ही आज उच्च स्थानवर कार्यरत आहे. सम्राट अशोक विद्यालयातील शिक्षक हे आपल्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जीवाचं रान करत त्यांना योग्य मार्गदर्शन देत असतात. शाळेचा निकाल १०० टक्के लागताच सोशल मीडियावर सम्राट अशोक विद्यालयातील शिक्षकांचे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.
