४ जणांचा मृत्यू, ५० पर्यटकांना वाचवण्यात यश
पुणे, दि. १५: पुणे जिल्ह्यात आज तळेगाव नजीक कुंडमळा इथे इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळल्याने ४ जणांचा मृत्यू झाला असून ५१ पर्यटक जखमी झाले तर २० ते २५ जण वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे. काही पर्यटक नदीत वाहून गेल्याची भीती असल्याने त्यांचा शोध घेण्यात येत आहे. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दलाचं पथक तसंच एनडीआरएफचं पथक दाखल झालं आहे. या दुर्घटनेतून सहा जणांना वाचवण्यात यश आलं आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रविवार असल्याने या परिसरात मोठ्या संख्येने पर्यटक आले होते. त्यापैकी काही जण पुलावर उभे असतानाच पूल कोसळला आणि अनेक जण नदीत पडले. आतापर्यंत ५१ पर्यटकांना वाचवण्यात यश आलेलं आहे. या दुर्घटनेविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केलं आहे. ही दुर्घटना दुर्दैवी, वेदनादायी असल्याचं सांगत या दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
Source – AIR
