२०० हून अधिक रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार चालू
इंदूर, दि. २: इंदौर शहरात दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या तब्येतीवर गंभीर परिणाम होत असून परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नसल्याचे चित्र आहे. हाती आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे, तर २०० हून अधिक रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. याशिवाय अनेकांना उलटी, जुलाब आणि अशक्तपणाच्या तक्रारींमुळे वैद्यकीय मदत घ्यावी लागत आहे.
भागीरथपुरा परिसरात आणखी एक मृत्यू
शुक्रवारी सकाळी भागीरथपुरा भागातील ६८ वर्षीय गीताबाई ध्रुवकर यांचे निधन झाले. त्यांना २४ डिसेंबर रोजी एमवाय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पती राजू यांच्या माहितीनुसार, दोन दिवस सतत उलट्या-जुलाब होत असल्याने त्यांची प्रकृती खालावत गेली. घरातच तब्बल ५० वेळा उलटी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. एमवाय रुग्णालयात दाखल केल्यानंतरही प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यानंतर त्यांना अरबिंदो रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तेथेही स्थिती गंभीरच राहिली. शेवटी वेंटिलेटरवर ठेवून उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
हाती आलेल्या वृत्तानुसार, २५ डिसेंबरपासून दूषित पाण्यामुळे रुग्णालयांत रुग्ण दाखल होण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला दोन रुग्णालयांत १८ रुग्ण होते. २८ डिसेंबरला आरोग्य विभागाची टीम आणि मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी रुग्णांची भेट घेतली. २९ डिसेंबरला डायरियामुळे पहिला मृत्यू नोंदवला गेला आणि संध्याकाळपर्यंत मृतांचा आकडा चारवर पोहोचला. ३० डिसेंबरला उघड झाले की गेल्या चार दिवसांत सलग मृत्यू होत असून संख्या १४ वर पोहोचली आहे. सध्या २०० पेक्षा जास्त रुग्ण उपचाराधीन आहेत, त्यापैकी सुमारे ३० जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
या भागातल्या पेयजलाचे नमुने अधिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले असल्याचंही इंदूरचे महापौर पुष्यमित्र भार्गव यांनी आज सांगितलं. नळाला लागलेल्या गळतीमुळे पेयजल दूषित झाल्याचा अहवाल एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेने दिल्याचं काल मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांनी काल सांगितलं होतं. गेले नऊ दिवस या भागातले सुमारे चौदाशे नागरिक उलट्या आणि जुलाब यांनी त्रस्त असल्याचं आढळून आलं आहे.
