हॉटेल मधील किचन पाहण्याची ग्राहकांना परवानगी मिळावी; शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांचा पालिकेसमोर हटके प्रस्ताव
मुंबई: बीएमसी च्या अथक प्रयत्नांनंतरही हॉटेल व खाद्यगृहात मिळणाऱ्या जेवणाचा निकृष्ट दर्जा, तेथील किचन मधली साफसफाई यांबाबत येणाऱ्या तक्रारी काही कमी झालेल्या नाहीत. यावर तोडगा काढण्यासाठी मुंबई महापालिकेतील शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी महापालिकेसमोर एक हटके प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावानुसार, इथे जाणाऱ्या ग्राहकांना स्वयंपाकगृह पाहण्याची परवानगी देण्यात यावी.
बीएमसी च्या ३९४ अधिनियमानुसार कोणत्याही अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्याला किचनमध्ये जाण्याची परवानगी आहे, पण सामान्य ग्राहकाला सध्यातरी अशी परवानगी नाही. तेजस्वी घोसाळकर यांचे म्हणणे आहे की ग्राहकांना जर अशा प्रकारची परवानगी मिळाली तर ते समाधानी होऊन त्या हॉटेल मधील अन्न खाऊ शकतात. आणि त्यायोगे हॉटेल मालकांवरही किचन स्वच्छ ठेवण्यासाठीचा दबाव वाढू शकेल.
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, ” खाद्यगृहातील मधील स्वयंपाकगृहात अस्वच्छता असल्यामुळे टायफाईड, जुलाब, उल्टी, हेपेटायटीस-बी, अतिसार या सारखे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्राहकांना किचन पाहण्याची परवानगी मिळणं गरजेचं आहे. या अधिनियमबाबत हॉटेल च्या प्रवेशद्वारावर नोटीस लावून ग्राहकांना या बाबत माहिती दिली जावी.”
घोसाळकर यांच्या मागणीप्रमाणे जर असा नियम आलाच तर मग अस्वच्छ हॉटेल्स, रेस्टॉरंट यांची काही खैर नाही. तसेही मुंबईत ६० टक्क्यांपेक्षा जास्त हॉटेल्स चे किचन हे न पाहण्याजोगेच आहेत. हा क्रांतिकारक निर्णय जर मुंबईत लागू झाला तर उर्वरित महाराष्ट्रातही लागू व्हायला वेळ लागणार नाही.
Like | Share | Comment करा
