“केंद्र शासनाच्या ‘सबका साथ सबका विकास’ तसेच सुशासनाच्या प्रतिज्ञेमागे अहिल्याबाई होळकर यांच्या वारशाची प्रेरणा” – केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांचे प्रतिपादन
नागपूर, दि. २५: केंद्र शासनाच्या ‘सबका साथ सबका विकास’ तसेच सुशासनाच्या प्रतिज्ञेमागे अहिल्याबाई होळकर यांच्या वारशाची प्रेरणा आहे. राणी अहिल्याबाई होळकर यांनी माळव्याचा राजकारभार चालवतांना तीर्थक्षेत्रांचा विकास या सोबतच आपल्या राज्यात लोकजीवन सुसह्य केले असे प्रतिपादन केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी आज केले.
लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त आज नागपूरच्या मिहान येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आयआयएम नागपूर येथे “तत्वज्ञानी राणी देवी अहिल्याबाई होळकर” या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदचे आयोजन करण्यात आले होते या परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना त्या बोलत होत्या. देवी अहिल्याबाई स्मारक समिती-नागपूर, मिथिक सोसायटी-बेंगळुरू, आयआयएम-नागपूर, डब्ल्यू.ई.एस. श्रीमती मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर- नागपूर आणि महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ-एनएलयू नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन सत्राला राष्ट्रीय सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का आणि आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मैत्री प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी देवी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना अन्नपूर्णा देवी यांनी सांगितले की अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या संस्थानाचा राज्यकारभार चालवत असताना काशी पासून सोमनाथ येथील तीर्थक्षेत्रांचा विकास केला. रस्ते, धर्मशाळा, घाट यांचे निर्माण केले. ही स्थाने आपले श्रद्धास्थान आहेत. लोकमाता अहिल्या होळकर यांनी केवळ धार्मिक तीर्थस्थळांचा विकासच केला नाही तर लोकांचे जीवनमान देखील सुसह्य केले. केंद्र शासन सुद्धा अहिल्याबाई होळकर यांनी दाखवलेल्या याच सुशासनाच्या मार्गावर अमृतभारत स्टेशन, स्मार्ट सिटी मिशन तसेच एक्सप्रेसवेच्या निर्माणामुळे लोकजीवन सुसह्य करत आहे. या पायाभूत सुविधे सोबतच सांस्कृतिक वारशाला देखील अधोरेखित करण्याचे काम केंद्र शासन करत आहे, असे केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी यावेळी स्पष्ट केले.
केंद्र शासनाच्या उज्वला योजना, आयुष्मान भारत योजना यांनी महिलांच्या जीवनात परिवर्तन आणले आहे. ‘मिशन शक्ती’ अंतर्गत प्रधानमंत्री मातृत्व योजना अंतर्गत ‘सुरक्षित मातृत्व सुनिश्चित केले आहे. आंतरराष्ट्रीय अहवालानुसार माता मृत्युदरात लक्षणीय घट झाली आहे. असे देखील अन्नपूर्णा देवी यांनी नमूद केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून देशाच्या संस्कृतीची प्रचिती ही नव्या पिढीला होत असून शैक्षणिक प्रगतीमध्ये एक अमुलाग्र बदल घडून आलेला आहे. यामुळे २०४७ पर्यंत भारत हा निश्चितच विकसित राष्ट्र बनेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला .
याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक समितीच्या संचालिका शांताक्का यांनी देवी अहिल्याबाई होळकर यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे पैलू सर्वांसमोर सोदाहरण स्पष्ट केले आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मैत्री यांनी सांगितले की आयआयएमने शिक्षण, प्रशिक्षण त्याचप्रमाणे उद्यमशीलता यावर विदर्भाच्या सर्वच शहरांमध्ये उपक्रम चालू केले आहेत. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे एक उपकेंद्र देखील सुरू करण्यासाठी आयआयएम नागपूरने पुढाकार घेतल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाप्रसंगी राकेश गुप्ता लिखित ‘डिझाईन थिंकिंग’ या पुस्तकाचे अनावरण केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते करण्यात आले. माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत एक विशेष स्पॉटलाइट सत्राचे आयोजनही या परिषदेत करण्यात आले होते. देवी अहिल्याबाई होळकर यांनी मंदिरांच्या जीर्णोद्धारामध्ये तसेच त्याच्या वास्तुशास्त्रामध्ये जे कौशल्य दाखवलं होते त्याचे संशोधन पेपर्स या परिषदेमध्ये प्रकाशित झाले या सर्व संशोधनाचा फायदा एक प्रशासक म्हणून आपल्याला घेता येईल असं स्मृती इराणी यांनी यावेळी सांगितले.
या परिषदेचा समारोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संबोधनाने झाला त्यांनी सांगितले की ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज अहिल्याबाई होळकर यांच्या इतिहासाच्या आणि वारश्याच्या महानतेमुळे आम्हाला प्रेरणा मिळते त्याचप्रमाणे विज्ञान आणि तंत्रज्ञान या आधुनिक गोष्टींचा देखील अंगीकार हा देशाने केला असल्यामुळे या दोघांच्या समन्वयाने आधुनिक राष्ट्र निर्मितीला अशा परिषदांचे आयोजन सहाय्यभूत ठरेल. अहिल्याबाई होळकर यांचे प्रशासन कौशल्य न्यायप्रियता संवेदनशीलतान याची नव्याने ओळख होईल असेही गडकरी यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला आयआयएम नागपूरचे पदाधिकारी त्याचप्रमाणे आयोजक संस्थाचे पदाधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते .
