उद्धव ठाकरे एच. एन. रिलायन्स इस्पितळात दाखल; अँजिओप्लास्टी झाल्याची माहिती
मुंबई, दि. १४: राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर थोड्याच वेळापूर्वी मुंबईतील एच. एन. रिलायन्स इस्पितळात अँजिओप्लास्टी करण्यात आल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी उद्धव ठाकरे यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे त्यांना एच. एन. रिलायन्स इस्पितळात तपासणीसाठी दाखल करण्यात आले. यावेळी अँजिओग्राफी झाल्यानंतर डॉक्टरांना त्यांच्या हृदयवाहिनीत ब्लॉकेजेस आढळून आल्यामुळे त्यांच्यावर तात्काळ अँजिओप्लास्टी करण्यात आली असल्याचे सांगितले जाते. २०१२ सालीही उद्धव ठाकरे यांच्यावर वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.
दोन दिवसांपूर्वी मुंबईतील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून महायुती सरकारवर विशेषतः शिंदे गट व भाजपवर कठोर टीका केली होती. या मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी एक प्रकारे आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
