नवी मुंबईतील दोन्ही जागा नाईक परिवाराला सोडल्यामुळे २०० शिवसेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
नवी मुंबई: विधानसभा निवडणूक २०१९ साठी शिवसेना-भाजप मध्ये युती झाल्याचे निश्चित झाल्यावर आता विविध भागातून या दोन्ही पक्षातून बंडखोरी व्हायला सुरुवात झाली आहे. नवी मुंबईतील ऐरोली व बेलापूर मतदारसंघ भाजपला सोडल्यामुळे येथील जवळपास २०० शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
नुकताच नवी मुंबईतील नाईक घराण्याने राष्ट्रवादीचा रस्ता सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर युतीत ऐरोली व बेलापूर विधानसभा मतदारसंघातील या जागा अनुक्रमे विद्यमान आमदार संदीप नाईक व त्यांचे पिता माजी मंत्री गणेश नाईक यांना सोडल्या जाणार असल्याचे कळते. यामुळे ज्या नाईक पितापुत्रा विरुद्ध जंग जंग पछाडलं त्यांचाच प्रचार करण्याची नामुष्की येत असल्यामुळे येथील उपजिल्हाप्रमुख, शहरप्रमुख, विभागप्रमुख व शाखाप्रमुख इत्यादी पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे सादर केले आहेत. यामुळे ही निवडणुकीत गणेश नाईक व संदीप नाईक यांना त्रासदायक ठरू शकते इतके नक्की.
