रेसिपी: गणपती स्पेशल शेवया आणि नारळाचे दूध
गणपती म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते आरती भाजनांनी गजबजलेलं कोकण, कोकणात गणेशोत्सवाचा जोर जरा अधिकच असतो म्हणूनच आज मी इथे कोकणातील साधी, सोपी अशी एक पाककृती लिहिणार आहे ती जेवढी सोपी आहे तेवढीच खाण्यास चवदार आहे.
शेवया बनवण्याची पद्धत –
१) प्रथम आवश्यक तेवढ्या प्रमाणात तांदळाचे पीठ घ्यावे आणि त्यात पाणी घालून त्याची उकड काढावी, अंदाजे दोन वाट्या पिठाला अडीज ते तीन वाटी पाणी उकड काढायला लागते.
२) उकड खाली उतरवून त्यास चांगले मळून घ्यावे, मळताना थोडं हाताला पाणी लावून मळावे जेणेकरून गरम पीठ मळताना हात भाजणार नाही आणि पिठही छान एकसंघ मळले जाईल.
३) मळून झाल्यावर त्याचे सोर्याच्या(साचेच्या) आकाराचे उंडे (दंडगोल) करावेत, व ते साच्यात भरून केळीच्या किव्वा हळदीच्या पानावर शेवया पाडाव्यात.
४) ह्या शेवया उकडीच्या भांड्यातून म्हणजेच स्टीमर मधून उकडून घ्याव्यात.
दूध काढण्याची पद्धत –
इथे दूध म्हणजे नारळाचे दूध होय आवश्यकतेनुसार ओला नारळ किसून घेऊन तो मिक्सर मध्ये पाणी घालून चांगला वाटून घ्यावा त्याच्यातील संपूर्ण दूध निघेपर्यंत तो वाटून घ्यावा आणि मग तो पिळून त्याचा रस गाळून घ्यावा ह्यालाच नारळाचे दूध असे म्हणतात. त्यात चावी नुसार गूळ व वेलची पूड घालावी गूळ छान वितळला कि वाटीत वाफाळलेला शेवया व वरून नारळाचे दूध घालावे आणि यथेच्छ ताव मारावा.
कोकणात तांदूळ आणि नारळ ह्यांचे प्रमाण अधिक आहे म्हणूनच तिथे प्रत्येक कार्यात ह्याचा समावेश असतो. सोपी आणि सहज वाटणारी हि पाककृती एकदा नक्की करून बघा जिभेवरून चव जाता जाणार नाही एवढं नक्की ! महाराष्ट्र वार्ता च्या सर्व वाचकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !
सौ. सुषमा चव्हाण (मुंबई)
