“रियल इस्टेट क्षेत्राने गरिबांना किफायतशीर घरे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध करावी” – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन
नागपूर, दि. २१: रियल इस्टेट क्षेत्रामध्ये डिझायनर्सनी केवळ उच्चभ्रू लोकांना आवडतील अश्या इमारतींच्या आणि घराच्या डिझाईन मध्ये लक्ष केंद्रित केले आहे, परंतु गरिबांना परवडणाऱ्या घराची उपलब्धता करून देण्यासाठी संशोधनाच्या माध्यमातून इंटेरियर डिझायनर तसेच रियल इस्टेट क्षेत्राने योगदान द्यावे असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर मध्ये केले. ‘डिझाईन शोकेस २६ अँड कॉनफ्लुएन्स 3.0’ , या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझायनरच्या नागपूर शाखेतर्फे तर्फे सिव्हिल लाईन्स येथील चिटणवीस सेंटर मध्ये आयोजित ३ दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन आज गडकरी यांच्या हस्ते झाले त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटेरिअर डिझायनर्सच्या नागपूर शाखेच्या अध्यक्षा अभिलाषा शर्मा उपस्थित होत्या.
सर्वात जास्त वस्तू सेवा कर देणारे रियल इस्टेट हे क्षेत्र असून या क्षेत्रातील तसेच इंटेरिअर डिझायनिंग क्षेत्रातील तज्ञांनी आपल्या ज्ञान आणि अनुभवाचा उपयोग करून बांधकाम साहित्यात पर्यायी सामग्रीचा कसा वापर करता येईल आणि घराची किंमत कशी कमी करता येईल याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे गडकरींनी सांगितले. स्मार्ट शहरासारखेच ‘स्मार्ट व्हिलेजेस’ सुद्धा निर्माण करणे आवश्यक आहे यासाठी या क्षेत्रांचा सक्रिय सहभाग गरजेचा आहे असे देखील त्यांनी सांगितले. डिझाईन शोकेस २६ हे प्रदर्शन २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत चिटणविस सेंटर येथे असून या प्रदर्शनामध्ये विविध कंपन्यांच्या इंटेरियर डिझायनिंग तसेच फर्निचर यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
