केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
नागपूर, दि. ८: भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये राजस्व अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असून ज्या प्रमाणात राजस्व संकलन होईल. तेवढ्या प्रमाणात लोक कल्याणकारी योजनांसाठी निधी उपलब्ध होतो .त्यामुळे भारतीय राजस्व सेवेतील अधिकाऱ्यांचे लोककल्याणकारी अर्थव्यवस्थेतील योगदान महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे केले. केंद्रीय प्रत्यक्ष कर अकादमी एनएडीटी अकादमीच्या स्थापना दिवसप्रसंगी आयोजित कार्यक्रमांमध्ये मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी एनएडीटीचे महासंचालक एस के मॅथ्यूज, आयकर लवाद प्राधिकरण -आयटीएटीचे अध्यक्ष न्यायमूर्ती चंद्रकांत भडंग प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी एनएडीटीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल बोलताना गडकरी यांनी सांगितले की, सहकाऱ्यांमध्ये समन्वय, सहकार्याने संवादातून तुम्ही यशस्वी होत असतात. या प्रशिक्षणातून हे शिकण्यासारख आहे. विद्वत्ते सोबतच प्रसंगावधान, व्यावहारिकता निर्णय क्षमता, पारदर्शकता महत्त्वाची आहे. यासाठी प्रशिक्षण आणि प्रबोधन आवश्यक आहे .
अनुभवी अधिकाऱ्यांच्या प्रशासनातील अनुभवाचा उपयोग प्रशिक्षणासाठी करण्याच त्यांनी सुचवले. निर्णय क्षमता जलद प्रक्रियेने राबवावी त्यामुळेच प्रकल्प मार्गी लागतात फाईल्स आणि कामे प्रलंबित ठेवून कंत्राटदार आणि इतर हितधारकांचेच नुकसान होते असे त्यांनी सांगितले. वित्तीय मूल्यांकन तर आवश्यक आहेच सोबतच कार्याचे देखील मूल्यमापन होणे गरजेचे आहे असे त्यांना स्पष्ट केले. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचा परिसर हा हिरवळीने नटलेला आहे याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाचे स्वागत पर भाषण अकादमीचे संचालक एस. के. मॅथ्यूज यांनी केले यावेळी त्यांनी अकादमीचा इतिहास उपस्थितासमोर मांडला. १९५७ ला कोलकाताच्या डायरेक्ट टॅक्स स्टाफ कॉलेजचे रूपांतर राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी मध्ये नागपूरला झाले आणि तेव्हापासून ही अकॅडमी नागपूर मध्ये कार्यरतअसल्याचे त्यांनी सांगितले. सध्या या अकॅडमीमध्ये १२८ भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी आणि २ रॉयल भूतान सर्विस मधील अधिकारी प्रशिक्षण घेत असून संघ लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून इंडियन रेव्हेन्यू सर्विस (आयकर) च्या अधिकाऱ्यांना येथे प्रशिक्षित केले जात असल्याचे त्यांनी सांगितले .
याप्रसंगी गडकरी यांनी अकादमीच्या हिंदी पत्रिका ‘अकादमी स्पंदन ‘ तसेच इंग्लिश न्यूज लेटरचे देखील प्रकाशन केले. या कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘कर याचिका आणि पुढील वाटचाल’ या विषयावरील एका चर्चासत्रामध्ये वरिष्ठ आयकर अधिकारी तसेच आयटीएटीचे अध्यक्ष यांनी चंद्रकांत भंडग यांनी सहभाग घेतला. या चर्चासत्रामध्ये कर याचिका निकाली काढण्यासाठी आयकर विभागाने ‘फेसलेस असेसमेंट’ त्याचप्रमाणे इतर विधी आयुधाचा कसा वापर करावा याबद्दल चर्चा करण्यात आली.
एनएडीटीच्या स्थापना कार्यक्रमाला वरिष्ठ आयकर अधिकारी, अकादमी मधील कर्मचारी अधिकारी तसेच प्रशिक्षणार्थी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
