Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“विमानतळ आणि रेल्वेमार्गाच्या कामाला गती” – उपमुख्यमंत्री अजित पवार

गडचिरोली जिल्ह्यात ट्रॉमा केअरसह सुसज्ज रुग्णालय उभारण्यास तत्वतः मंजुरी

रुग्णालयासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश

मुंबई/गडचिरोली, दि.२४: मागास, अदिवासी आणि नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पोलिसांवर त्वरित उपचार करता यावेत तसेच स्थानिक आरोग्य सेवेचा दर्जा सुधारावा यासाठी जिल्ह्यात ट्रॉमा केअरसह सुसज्ज असे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय तयार करण्याच्या मागणीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

या रुग्णालयाच्या उभारणीसाठी आर्थिक तरतूद करण्यासोबतच तिथे तज्ज्ञ स्टाफच्या नेमणुकीसाठी जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. त्यासोबतच जिल्ह्यात जलद येजा करता यावी तसेच कोनसरी लोहखनिज प्रकल्पाला मदत आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी जिल्ह्यात विमानतळ आणि गडचिरोली-कोनसरी या रेल्वे मार्गाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश देखील उपमुख्यमंत्री पवार यांनी या बैठकीत दिले.

गडचिरोली जिल्ह्यातील विविध प्रश्नांसंदर्भात आज मंत्रालयात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरविकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील हे दूरदृष्यप्रणाली मार्फत उपस्थित होते, तर सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास, अपर मुख्य सचिव (नियोजन) नितीन गद्रे, प्रधान सचिव (नागरी विमान) वल्सा नायर, वित्तिय सुधारणा सचिव ए. शैलजा, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागणीला उपमुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद

पालकमंत्री शिंदे यांनी गडचिरोली जिल्ह्यात होणारे नक्षलवाद्यांचे हल्ले आणि त्यात जखमी होणाऱ्या पोलीसांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी जिल्ह्यात सर्व सोयींनी युक्त अशा रुग्णालयाची आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. याठिकाणी लष्कराच्या धर्तीवर दिडशे खाटांचे सामान्य रुग्णालय तयार करावे आणि त्यातील ५० खाटा या ट्रॉमा केअरसाठी राखीव ठेवाव्यात असे यावेळी निश्चित करण्यात आले. या नव्याने तयार होत असलेल्या रुग्णालयात सिटी स्कॅन, एमआरआय यासारख्या अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून घ्याव्यात, याठिकाणी नेमणूक देतांना डॉक्टरांना विशेष पॅकेज देऊन तज्ज्ञ स्टाफची नेमणूक करण्यासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून त्यात मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्यासह इतर तज्ज्ञ लोकांचा समावेश करावा, असे निर्देश यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

दोनशे एकर जमिनीवर विमानतळ

गडचिरोली जिल्ह्यातील दळणवळण अधिक गतिमान व्हावे यासाठी जिल्ह्यात सुमारे २०० एकर जमिनीवर विमानतळ प्रस्तावित करण्यात आले आहे. यासाठी लागणाऱ्या जमीनीची उपयुक्तता तपासून घेण्यासाठी ही माहिती विमानतळ प्राधिकरणाकडे पाठवावी असे वल्सा नायर यांनी सांगितले. तर, विमानतळ उभारणीसाठी एअरपोर्ट अथॉरिटी कडून शक्यता (फिजीबलीटी) तपासून घेऊन यासाठी लागणारी तांत्रिक पाहणी करण्यासाठी नागपूर येथून तज्ज्ञ व्यक्ती पाठविण्यात येईल, असे कपूर म्हणाले.  त्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल असे या बैठकीत निश्चित करण्यात आले.

गडचिरोली-वडसा- कोनसरी रेल्वेमार्गाच्या कामासाठी राज्य शासन रेल्वेला संमतीपत्र देणार

गडचिरोली जिल्हातील गडचिरोली-वडसा-कोनसरी हा रेल्वे मार्गाच्या उभारणीला २०१५ साली मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली होती. मात्र हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या आणि वित्तीय मान्यता मिळणे अद्याप बाकी होते. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास कोनसरी येथील प्रस्तावित लोहखनिज प्रकल्पाला त्याचा फायदा होईल तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध मिळवून देणे शक्य होईल त्यामुळे या प्रकल्पाला लवकरात लवकर मंजुरी देण्याची मागणी या बैठकीत करण्यात आले. त्यानुसार या प्रकल्पाबाबत रेल्वेला तत्काळ संमतीपत्र देऊन त्यानंतर सुधारित वित्तीय मान्यतेसाठी हा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर आणून तो संमत करून घ्यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

गडचिरोली ते कोनसरी हा ६० किलोमीटरचा रेल्वेमार्ग तयार होऊन गडचिरोली रेल्वेमार्गाने जोडला गेल्यास हा दुर्गम भाग रेल्वेने जोडला जाईल, तसेच या भागात अनेक उद्योजक आकर्षित होतील आणि रोजगारास चालना मिळेल, नक्षल भागात रोजगार निर्मिती झाल्यास त्याचा फायदा इथला नक्षलवाद कमी होण्यास होईलच पण त्याचबरोबर शासनाच्या महसुलातही वाढ होईल.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *