बनावट हॉलमार्क असलेल्या सोन्याच्या दागिन्यांबाबत कारवाई करत बीआयएस, मुंबई शाखा कार्यालय-II ने बदलापूरमध्ये दागिने केले जप्त
मुंबई, दि. २०: भारतीय मानक संस्था (बीआयएस) च्या मुंबई शाखा कार्यालय – II ने १९ मार्च २०२५ रोजी ठाणे जिल्ह्यात बदलापूर पूर्व येथील मेसर्स जय भवानी ज्वेलर्स यांच्या विरोधात शोध व जप्तीची कारवाई केली. या कारवाईदरम्यान २५१.३९० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून, त्यांची अंदाजे किंमत २१ लाख रुपये इतकी आहे. या दागिन्यांवर बनावट हॉलमार्क चिन्हे होती आणि त्यांना वैध हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन डिजिट (एचयुआयडी) नव्हते.
३ मार्च २०२३ रोजीच्या गॅझेट अधिसूचना क्रमांक 1047(E) नुसार, हॉलमार्किंग ऑफ गोल्ड ज्वेलरी अँड गोल्ड आर्टिफॅक्ट्स (सुधारणा ) आदेश, २०२३ अंतर्गत, ३१ मार्च २०२३ नंतर कोणत्याही सराफाला वैध एचयुआयडी चिन्हाशिवाय सोने विक्री करण्यास मनाई आहे. या नियमनाचे पालन होत आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अधिनियम, २०१६ अंतर्गत संबंधित सराफाविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. या अधिनियमानुसार, दोषींना न्यायालयाच्या निर्णयानुसार एका वर्षाची कारावासाची शिक्षा किंवा किमान १ लाख रुपये दंड (जो जप्त केलेल्या मालाच्या पाचपटीपर्यंत वाढू शकतो) किंवा दोन्ही शिक्षांचा समावेश असू शकतो.
ग्राहकांना फसवणुकीच्या प्रकरणांपासून वाचवण्यासाठी, बीआयएस सक्रियपणे शोध व जप्तीच्या मोहिमा राबवित आहे. जे उत्पादक व विक्रेते बनावट किंवा नियमबाह्य वस्तूंची विक्री करत आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. ग्राहकांनी सोन्याच्या दागिन्यांची आणि अन्य बीआयएस-प्रमाणित उत्पादनांची बीआयएस केअर ॲपद्वारे सत्यता पडताळणी करावी.जर बीआयएस मानक चिन्ह (आयएसआय मार्क, बीआयएस रजिस्ट्रेशन मार्क, बीआयएस हॉलमार्क किंवा बीआयएस मॅनेजमेंट सिस्टम सर्टिफिकेशन) चा गैरवापर होत असेल, तर त्यासंदर्भात तक्रारी ई-मेल, पत्र किंवा बीआयएस केअर ॲपद्वारे (गुगल प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअर वर उपलब्ध) नोंदवता येतील. तक्रारदाराची ओळख गुप्त ठेवली जाईल.
