देशपातळीवर ईपीएफओ सदस्यांच्या संख्येत २१.०४ लाखांची भर
नवीन सदस्यांपैकी ६० % हून अधिक जण १८ ते २५ वयोगटातील
नवी दिल्ली, दि. २४: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) ने जुलै २०२५ ची प्राथमिक वेतनपट आकडेवारी जारी केली आहे, या महिन्यात संघटनेच्या सदस्यांची संख्या २१.०४ लाखांनी वाढल्याचे दिसून आले आहे. या आकडेवारीच्या वर्ष-दर-वर्ष विश्लेषणानुसार, वेतनपटावरील कर्मचारी संख्या जुलै २०२४ च्या तुलनेत ५.५५ % नी वाढल्याचे दिसून आले असून, ही वाढ नोकरीच्या वाढत्या संधी आणि कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या लाभांबद्दलच्या वाढत्या सजगतेचे द्योतक असून ईपीएफओच्या प्रभावी आउटरीच उपक्रमांचीही त्याला मदत झाली आहे. वेतनपटावरील कर्मचाऱ्यांच्या संख्येतील वाढीत महिनाभरात २०.४७ % योगदान देऊन महाराष्ट्र आघाडीवर आहे.
ईपीएफओच्या वेतनपट आकडेवारीची (जुलै २०२५) ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणेः
नवीन सदस्य:
जुलै २०२५ मध्ये ईपीएफओकडे सुमारे ९.७९ लाख नवीन सदस्यांनी नोंदणी केली. नवीन सदस्यांच्या संख्येतील या वाढीस नोकरीच्या वाढत्या संधी, कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या लाभांबद्दलची वाढलेली जागरूकता आणि ईपीएफओच्या आउटरीच कार्यक्रमांचे यश कारणीभूत असल्याचे म्हणता येईल .
नवीन सदस्यांमध्ये १८-२५ वयोगटाचे अधिक्य:
१८ ते २५ वयोगटातील सदस्यांचे सर्वाधिक प्रमाण हा डेटाचा एक उल्लेखनीय पैलू आहे. ईपीएफओकडे १८-२५ वयोगटातील ५.८९ लाख नवीन सदस्यांनी नोंदणी झाली असून जुलै २०२५ मध्ये समाविष्ट झालेल्या एकूण नवीन सदस्यांमध्ये त्यांचे प्रमाण ६१.०६ % आहे.
याशिवाय, जुलै २०२५ मध्ये वेतनपटात समाविष्ट झालेल्या १८ ते २५ वयोगटातील सदस्यांची निव्वळ संख्या अंदाजे ९.१३ लाख असून ती मागील वर्षाच्या म्हणजे जुलै २०२४ च्या तुलनेत ४.०९ % नी वाढल्याचे आढळते. ही वाढ पूर्वीच्या ट्रेंडशी सुसंगत असून संघटित कार्यबलात सामील होत असलेल्या बहुतांश व्यक्ती तरुण असल्याचे आणि प्रामुख्याने प्रथमच नोकरी करणाऱ्या असल्याचे सूचित होते.
पुन्हा सामील झालेले सदस्य:
यापूर्वी बाहेर पडलेले सुमारे १६.४३ लाख सदस्यांनी जुलै २०२५ मध्ये पुन्हा ईपीएफओमध्ये नोंदणी केली आहे. ही संख्या जुलै २०२४ च्या तुलनेत १२.१२ % एवढी लक्षणीय वाढल्याचे दिसते. हे सदस्य नोकऱ्या बदलून ईपीएफओच्या कार्यकक्षेत समाविष्ट असलेल्या उपक्रमांमध्ये पुन्हा सामील झाले असून त्यांच्या नावे जमा झालेली रक्कम मिळण्यासाठी अर्ज करून खाते बंद करण्याऐवजी आपल्या दीर्घकालीन आर्थिक हिताचा विचार करून ती पुढे हस्तांतरित करण्याच्या पर्यायाची निवड करून आपली सामाजिक सुरक्षा आणखी वाढेल याची काळजी घेतली आहे.
महिला सदस्यांच्या संख्येत वाढ:
जुलै २०२५ मध्ये सुमारे २.८० लाख नवीन महिला सदस्यांनी ईपीएफओच्या सदस्यत्वासाठी नोंदणी केली. शिवाय, जुलै २०२४ च्या तुलनेत वर्षभरात ०.१७ % वाढीसह महिन्याभरात वेतनपटावरील महिला सदस्यांची संख्या सुमारे ४.४२ लाख झाली. नवीन सामील झालेल्या महिला सदस्यांच्या संख्येतील वाढीतून कार्यबलात अधिकाधिक समावेशकता आणि वैविध्यपूर्ण येत असल्याचे सूचित होते.
राज्यनिहाय योगदान:
वेतनपट आकडेवारीचे विश्लेषण केले असता प्रमुख पाच राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचा एकंदर वेतनपटात सुमारे ६०.८५ % वाटा असल्याचे आढळले असून या राज्यांमधून महिन्याभरात सुमारे १२.८० लाख सदस्यांची भर पडली आहे. या राज्यांमध्ये, वेतनपटावरील कर्मचाऱ्यांच्या संख्येतील वाढीत महिनाभरात २०.४७ % योगदान देऊन महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, हरियाणा, दिल्ली, तेलंगण आणि उत्तर प्रदेश या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये महिन्याभरात वेतनपटात 5% हून अधिक नवीन सदस्यांची भर पडली.
उद्योगानिहाय ट्रेंड:
उद्योग-निहाय आकडेवारीची महिना-दर-महिना तुलना करता वेतनपटावरील सदस्य संख्येतील वाढीत उद्योग क्षेत्रातील आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या सदस्यांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसते उदा.
i. लोह खनिज खाणी
ii. विद्यापीठ
iii.विडी उद्योग
iv. तयार कपड्यांची निर्मिती
v. रुग्णालये
vi. इतर
vii. व्यापार – व्यावसायिक संस्था
viii. ट्रॅव्हल एजन्सीज
ix. छत-जमिनीसाठी वापरल्या जाणाऱ्या दगडाच्या खाणी इ.
निव्वळ सदस्यांमधील एकूण वाढीत तज्ञ सेवांमधील व्यक्तींचे प्रमाण अंदाजे ४०.२१ % आहे.
कर्मचाऱ्यांच्या नोंदी अद्ययावत करणे, हे अखंडपणे चालणारे काम असल्याने डेटा तयार करणे, ही एक सतत सुरू राहणारी प्रक्रिया असते, त्यामुळे हा पेरोल डेटा तात्पुरता आहे. मागील डेटा दर महिन्याला यावर पुढील गोष्टींनुसार अद्ययावत केला जातो:
i.वेतन अहवाल तयार केल्यानंतर मागील महिन्यांचे ईसीआर दाखल केले जातात.
ii.वेतन अहवाल तयार केल्यानंतर पूर्वी दाखल झालेल्या ईसीआरमध्ये सुधारणा करण्यात येतात.
iii.मागील महिन्यांची बाहेर पडण्याची तारीख पेरोल अहवाल तयार केल्यानंतर नोंदविली जाते.
एप्रिल २०१८ पासून, ईपीएफओ सप्टेंबर २०१७ नंतरच्या कालावधीचा समावेश असलेला वेतनपट डेटा जारी केला जात आहे. मासिक पेरोल डेटामध्ये, आधार प्रमाणित युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) द्वारे प्रथमच ईपीएफओ मध्ये सामील झालेल्या सदस्यांची संख्या, ईपीएफओच्या कक्षेतून बाहेर पडलेले विद्यमान सदस्य आणि ज्यांनी बाहेर पडल्यानंतर पुन्हा सदस्य म्हणून नोंदणी केली आहे अशांना मासिक वेतनपटावरील सदस्य म्हणून विचारात घेतले जाते.
