जवळपास ५ वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग मोकळा
नवी दिल्ली, दि. ६: मागील जवळपास ५ वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आज झालेल्या ताज्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अधिसूचना चार आठवड्यात काढण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. ओबीसी आरक्षणाच्या अंमलबजावणी संदर्भात न्यायालयात याचिका दाखल असल्याने २०२२ पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. जुलै २०२२ मधे बाठिया आयोगाचा अहवाल येण्याआधी ओबीसी आरक्षणाबाबत जी तरतूद होती त्यानुसार या निवडणुका घ्याव्यात असं, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन. कोटीश्वर सिंह यांच्या पीठाने आज सांगितलं. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया चार महिन्यांच्या आत पूर्ण करायच्या सूचनाही न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला दिल्या.
Source – AIR
