महापालिका निवडणुकांनंतर नवी मुंबईत राजकीय वाद पेटण्याची चिन्हे; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना थेट इशारा
ठाणे/नवी मुंबई, दि. २६: राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी पार पडल्या. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत भाजप नेते व वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय तणाव चर्चेत आला होता. निवडणूक निकालानंतर हा वाद शमलेल, अशी अपेक्षा असतानाच आता गणेश नाईक यांच्या नव्या विधानामुळे हा संघर्ष पुन्हा उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एकनाथ शिंदेंना थेट लक्ष्य करत गणेश नाईक म्हणाले, “भाजपाने परवानगी दिली, तर यांचे नामोनिशाण संपवून टाकू. मी आज परत बोलतो आहे.” मात्र, याच वेळी त्यांनी भाजप हा शिस्तबद्ध पक्ष असल्याचे अधोरेखित करत स्पष्ट केले की, “भाजप हा शिस्त पाळणारा पक्ष आहे. पक्षाने आदेश दिला म्हणून आम्ही ते मान्य केले. मनाला पटले नसले तरीही कार्यकर्त्यांनी सहन केले. पक्ष नेतृत्वाचा निर्णय आम्ही मान्य केला.”
गणेश नाईक म्हणाले की, “एके काळी मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडली होती. ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात महायुतीतील सर्व कार्यकर्त्यांना स्वतंत्रपणे लढू द्यावे. निवडणुकीनंतर ज्यांचे नगरसेवक जास्त निवडून येतील, त्यांना मित्र पक्षांनी पाठिंबा द्यावा आणि उर्वरित पदांची वाटणी करावी, असे माझे मत होते.”
फडणवीसांशी चर्चा झाली, पण निर्णय नाही
या संदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याचेही नाईक यांनी सांगितले. “मी ही बाब मुख्यमंत्र्यांना सांगितली होती. त्यांनी त्यावर होकार दिला नाही आणि नकारही दिला नाही. आम्हाला अपेक्षा होती की कार्यकर्त्यांना संधी मिळेल, मात्र काही ठिकाणी ती संधी मिळाली नाही,” असे नाईक म्हणाले.
नवी मुंबईतील जागावाटपावर स्पष्ट विधान
नवी मुंबईतील जागावाटपावर भाष्य करताना गणेश नाईक म्हणाले, “नवी मुंबईत शिवसेनेकडून ५७ जागांची मागणी करण्यात आली होती. मात्र, आम्ही त्यांना २० ते २२ जागा देण्यास तयार होतो. शेवटच्या दिवसापर्यंत चर्चा सुरू होत्या. अखेर त्यांनी एबी फॉर्म भरले आणि आम्हीही भरले. त्यानंतर जे झालं, ते चांगलंच झालं.”
यावेळी ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीचा संदर्भ देत त्यांनी टोला लगावला. “ठाण्यातील लोकांना अशी करामत करता आली नाही. ठाण्यात भाजपाच्या घोड्यांचे लगाम खेचले गेले. कल्याणमध्येही तसेच झाले. तरीही पक्षाला जे मान्य होते, ते आम्ही मान्य केले,” असेही ते म्हणाले.
गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा भाजपच्या शिस्तीवर भर देत सांगितले, “भाजपा हा शिस्तीचा पक्ष आहे. एकदा आदेश दिला की तिथे इतर काही येत नाही.” ठाणे, उल्हासनगर आणि कल्याण-डोंबिवलीतील भाजप कार्यकर्त्यांची स्थिती मांडताना ते म्हणाले, “हे मी बोलणार नाही, तर कोण बोलणार? तरीही कार्यकर्त्यांनी पक्षशिस्त पाळली, हे कौतुकास्पद आहे.”
स्वतंत्र लढतीबाबत वैयक्तिक मत
आपली जुनी भूमिका पुन्हा मांडताना नाईक म्हणाले, “सगळ्या पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली असती, तर ज्यांचे नगरसेवक जास्त निवडून आले असते, त्यांना महापौर पदासह इतर प्रमुख पदे मिळाली असती. मात्र, हे पूर्णपणे माझे वैयक्तिक मत आहे.”
महापालिका निवडणुकांनंतर महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाले असून, नवी मुंबईसह ठाणे आणि मुंबई महानगर प्रदेशातील राजकीय हालचालींकडे आता लक्ष लागले आहे.
