लोकसभेत खासदार निशिकांत दुबे यांची नेहरू-गांधी कुटुंबावर जहरी टीका
नवी दिल्ली : लोकसभेतील चर्चेदरम्यान भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू तसेच नेहरू-गांधी कुटुंबावर तीव्र शब्दांत टीका केली. राहुल गांधी यांनी एका अप्रकाशित पुस्तकाच्या मुद्द्यावरून गेल्या तीन दिवसांपासून संसद ठप्प ठेवली असल्याचा आरोप त्यांनी केला.
निशिकांत दुबे म्हणाले की, “राहुल गांधी एका पुस्तकासाठी संसदेला बंधक बनवून ठेवत आहेत. मी त्या एका पुस्तकाच्या बदल्यात १०० छापील पुस्तके संसद भवनात घेऊन आलो आहे. नेहरू-गांधी कुटुंबाचा खरा इतिहास देशासमोर यायला हवा.”
नेहरू-गांधी कुटुंबावर गंभीर आरोप
आपली टीका अधिक तीव्र करताना दुबे म्हणाले, “माउंटबॅटन आणि एडविना यांच्यासोबत संगनमत करून देशाची फाळणी कशी करण्यात आली, तसेच नेहरू एडविनासोबत बसून देशाची गोपनीय माहिती कशी शेअर करत होते, हे देशाने जाणून घेतले पाहिजे. अप्रकाशित पुस्तकावरून संसद अडवली जाते, मग छापील पुस्तकांवर चर्चा का होत नाही?”
नेहरू-गांधी कुटुंबाचा इतिहास हा “खोटेपणा, मक्कारी, भ्रष्टाचार आणि देश तोडणाऱ्या विचारांनी भरलेला आहे,” असा आरोपही त्यांनी केला.
काँग्रेसवर देशाचे नुकसान केल्याचा आरोप
निशिकांत दुबे यांनी काँग्रेस पक्षावरही हल्लाबोल केला. ते म्हणाले, “या सर्व पुस्तकांवर नेहरू-गांधी कुटुंबाने बंदी घातली आहे. संपूर्ण काँग्रेस पक्षाने देशाचे नुकसान केले आहे. भ्रष्ट आणि देशविरोधी शक्तींना साथ दिली आहे. नेहरू-गांधी कुटुंब आजही स्वतःला देशाचे राजा समजते आणि राजेशाही मानसिकतेत वावरते. या सर्व पुस्तकांवर संसदेत चर्चा व्हायला हवी.”
राहुल गांधींचा पंतप्रधानांना पुस्तक भेट देण्याचा दावा
दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी बुधवारी (४ फेब्रुवारी २०२६) संसदेत माजी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाची प्रत घेऊन उपस्थित झाले होते. या पुस्तकातील एका भागाचा संदर्भ देत त्यांनी दावा केला की, “जेव्हा चीनचे टँक भारताच्या सीमेच्या दिशेने सरकत होते, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही.”
राहुल गांधी यांनी असेही स्पष्ट केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जर संसदेत उपस्थित राहिले, तर ते हे पुस्तक त्यांना भेट म्हणून देतील.
