अमरावतीतील ड्रग्सविरोधी कारवायांवर शासनाचे बारकाईने लक्ष असल्याचे गृह राज्यमंत्री कदम यांचे विधानपरिषदेत प्रतिपादन
मुंबई, दि. १० : अमरावती शहरातील ड्रग्सविरोधी कारवायांवर राज्य शासनाचे बारकाईने लक्ष असून पुढील दोन महिन्यांत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला जाईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत दिली. सदस्य संजय खोडके यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी सदस्य अभिजित वंजारी यांनी चर्चेत सहभाग घेतला. राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, अमरावती शहरात २०२१ ते २०२६ या कालावधीत ड्रग्ससंबंधित २९ गुन्हे नोंदवून १०१ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. नुकतेच नागपूर गेट पोलीस ठाण्याने सुमारे २ किलो एमडी ड्रग्ज जप्त केल्याची माहिती ही त्यांनी दिली.
राज्यात स्थापन करण्यात आलेली अँटी नारकोटिक्स टास्क फोर्स सक्रियपणे कार्यरत असून या पथकाला आवश्यक मनुष्यबळ व विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णयही मुख्यमंत्री यांनी घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. ड्रग्सविरोधी कारवाया गुप्त माहितीच्या आधारे विविध ठिकाणी केल्या जात असून या कारवाया सातत्याने आणि आक्रमकपणे सुरू राहतील, असे गृह राज्यमंत्री कदम यांनी यावेळी सांगितले.
