अफजलखानाच्या शामियान्यात जाऊन मुजरा करण्याची पाळी का आली ? – धनंजय मुंडे
अफजलखानाच्या शामियान्यात जाऊन मुजरा करण्याची पाळी का आली असा सवाल विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी शनिवारी भाजपाध्यक्ष अमित शाह उमेदवारी अर्ज भरणार असून यावेळी त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. याच पार्श्वभुमीवर धनंजय मुंडे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ‘अफजलखानाच्या फौजा महाराष्ट्रावर चालून आल्या आहेत असे यांनीच भाजपला हिणवले होते ना? मग आता अशा कोणत्या ‘ईडी’पीडा आल्या आहेत की अफजलखानाच्या शामियानात जाऊन मुजरा करण्याची पाळी यांच्यावर आली आहे’.
विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना आणि भाजपा नेत्यांनी एकमेकांवर टीका केली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपाध्यक्ष अमित शाह यांची अफजलखानशी तुलना केली होती. याच टीकेचा फायदा घेत धनंजय मुंडे यांनी आज उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे.
