कर्नाटकात कथित अश्लील व्हिडिओमुळे खळबळ; डीजीपी दर्जाच्या अधिकाऱ्याविरोधात चौकशीची मागणी
बंगळुरू, दि. १९: बड्या अधिकाऱ्यांच्या हनी-ट्रॅप प्रकरणांची चर्चा सुरू असतानाच कर्नाटकात पुन्हा एकदा कथित अश्लील व्हिडिओ प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात कोणत्याही राजकारण्याचा सहभाग नसून, डीजीपी दर्जाचे आयपीएस अधिकारी डॉ. रामचंद्रराव यांचा सहभाग असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. महिलांसोबत आक्षेपार्ह वर्तन करतानाचा असल्याचा सांगितला जाणारा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर फिरत असलेल्या या कथित व्हिडिओबाबत तो डीजीपी कार्यालयातच चित्रीत झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. कार्यालयीन वेळेत व कर्तव्यावर असतानाच महिलांसोबत अनुचित वर्तन झाल्याचे व्हिडिओत दिसत असल्याचा दावा केला जात असून, वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या कपड्यांमध्ये आलेल्या महिलांना मिठी मारणे व चुंबन घेणे असे प्रकार दिसत असल्याचे म्हटले जात आहे. हा व्हिडिओ गुप्त कॅमेऱ्याद्वारे रेकॉर्ड करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, या दाव्यांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
या प्रकरणामुळे पोलिस दलाच्या शिस्तीवर, प्रतिष्ठेवर आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. संबंधित महिलांवर कोणतीही जबरदस्ती झाल्याचा आरोप नसल्याचे सांगितले जात असले, तरी कार्यालयीन वेळेत व गणवेशात अशा स्वरूपाचे वर्तन झाल्याचा आरोप गंभीर मानला जात आहे.
दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणाची दखल घेत सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केल्याची माहिती समोर येत आहे. सध्या डॉ. रामचंद्रराव हे नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालयाचे डीजीपी म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले जाते. मुख्यमंत्री या कथित प्रकारामुळे नाराज असल्याचीही चर्चा आहे.
राज्य सरकार या प्रकरणात औपचारिक चौकशीचे आदेश देणार का, संबंधित अधिकाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात पदावरून दूर ठेवले जाईल का, तसेच व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी फॉरेन्सिक चौकशी होणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तोपर्यंत, सर्व आरोप हे तपासाधीन व कथित स्वरूपाचे असल्याचे स्पष्ट केले जात असून, अधिकृत निष्कर्षांनंतरच पुढील कारवाईची दिशा स्पष्ट होणार आहे.
