“पुण्यासाठी आणखी ५ नवीन पोलीस स्टेशनला मान्यता देणार” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे, दि. ८: पोलिसांसमोराची आव्हाने, कायदा व सुव्यवस्थेचे नवे प्रश्न लक्षात घेऊन ६० वर्षानंतर पोलीस दलाचा नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. पोलीस स्टेशनची नवी रचना, नार्कोटीक्स, फॉरोन्सिक युनिट तयार करण्यात आले आहे. यापुढेही पोलस दल आधुनिक करण्यासाठी शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल. तसेच पुणे शहरासाठी लोहगाव, लक्ष्मीनगर, नऱ्हे, मांजरी, येवलेवाडी अशा पाच पोलीस स्टेशनची मागणी केली असून त्यास मंजुरी देण्यात येईल. त्यासाठी लागणाऱ्या एक हजार मनुष्यबळाला मान्यता देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
पोलीस मुख्यालय शिवाजीनगर येथे आयोजित पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्यावतीने शहरात उभारण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन आणि नवीन उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, अपर मुख्य सचिव (गृह) इक्बालसिंह चहल, पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रजंन कुमार शर्मा आदी उपस्थित होते.


कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘दृष्टी’ इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर व चंदननगर पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन, तसेच लोणीकाळभोर, नांदेड सिटी, खराडी, कोंढवा पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे प्रकल्पाचे दूरदृष्यप्रणालीद्वारे भूमिपूजन करण्यात आले. त्यांनी ‘दृष्टी’ इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरची पाहणी करून माहिती घेतली.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते दृष्टी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरचे उद्घाटन, मोबाईल सर्वेलन्स व्हॅनचे लोकार्पण आणि ड्रोन फ्लॅग ऑफ करण्यात आले. चंदन नगर पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन, लोणी काळभोर , नांदेड सिटी, खराडी, कोंढवा पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतींचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी आयटीएमएस यंत्रणेची उद्घोषणा केली. पोलीसांनी २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे विश्लेषण करून धाराशीव येथून सुखरूप परत आणलेल्या कात्रज येथील कोमल काळे या दोन वर्षाच्या मुलीचा सत्कार मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आला. या प्रकरणाच्या तपासात योगदान देणाऱ्या पोलीसांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. उपस्थित महिलांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांना राखी बांधली.
कार्यक्रमाला आमदार उमा खापरे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, भीमराव तापकीर, राहुल कूल, बापुसाहेब पठारे, चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, शंकर जगताप, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, जिल्हधिकारी जितेंद्र डुडी आदी उपस्थित होते.
