महाराष्ट्र नवनिर्माण विभागाकडून पर्यटन विभाग व खात्याच्या मंत्र्यांना शालजोडीतले टोले
मुंबई, दि. २२: दुसऱ्याच्या कामाचं श्रेय घेण्याचे प्रकार आपल्या अवतीभवती घडत असतात. असे प्रकार शक्यतो सर्व क्षेत्रात घडत असतात परंतु यात राजकारण्यांनी सर्वांवर कडी केलेली आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. पण हा प्रकार जर कोणा सरकारी आस्थापनाकडून तोही एका राजकीय पक्षासोबत घडला असेल तर याची दखल तर घेतली जाणारच. महाराष्ट्र पर्यटन विभागाने त्यांच्या एक्स हॅण्डलवरून, मनसे आयोजित मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरील ‘दीपोत्सवाची’ काही क्षणचित्रं दाखवून पुढे हा अनुभव घ्यायला या असं मुंबई आणि मुंबई बाहेरील पर्यटकांना असं आवाहन केलं आहे. यावर मनसेने राज्याचा पर्यटन विभाग व या विभागाचे मंत्री शंभूराज देसाई यांना खडे बोल सुनावत किमान मनसेचे नाव सौजन्य म्हणून नमूद करण्याची मागणी केली आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक्स या समाज माध्यमावर एक पोस्ट केली आहे.
जाणून घ्या या पोस्टच्या माध्यमातून मनसेने काय म्हटले आहे:
दिवाळी हा हिंदूंचा सगळ्यात मोठा सण आणि या सणाच्या निमित्ताने गेली १३ वर्ष दीपोत्सव हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवाजी पार्क मैदानावर करत आहे… हा दीपोत्सव जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना करत असली तरी तो पूर्ण अराजकीय राहील हे आम्ही पाहिलं आणि आमचा उद्देश फक्त आणि फक्त लोकांना आनंद मिळावा हाच आहे आणि राहील… पण जेंव्हा महाराष्ट्र सरकारचा एक विभाग या दीपोत्सवाचं मार्केटिंग हे स्वतः हा विभाग करत असल्यासारखं जेंव्हा दाखवतं तेंव्हा विशेष आश्चर्य वाटलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला याचं अगदी छोटंसं श्रेय दिलं असतं तर निश्चित आम्हाला आनंद झाला असता आणि सरकारच्या मनाचा उमदेपणा दिसला असता… नाशिकमध्ये सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे केलं ते पुढे तत्कालीन सरकारनेच केलं अशी जाहिरातबाजी झाली.. असो.. पण तुमचे नेते ते आमचे नेते, तुमचा पक्ष आमचा पक्ष अशी कार्यपद्धती सत्ताधारी पक्षाची आहे हे दिसतंच आहे. पण आता दुसऱ्यांचे चांगले कार्यक्रम सुद्धा आपलेच आहेत हे दाखवण्यापर्यंत सरकार जाईल असे वाटले नव्हते ! असो. आम्ही मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने एक अभिजात कार्यक्रम यावर्षी केला, दीपोत्सव तर असतोच, असे सामान्यांना आनंद देणारे अनेक उपक्रम आम्ही करत राहणार आहोतच. त्यावेळी देखील पर्यटन विभागाला ते आमचे आहेत म्हणण्याचा मोह होईल इतके ते छान करूच, फक्त त्यावेळेस त्याचं श्रेय आमच्या पक्षाला जरूर द्या म्हणजे झालं ! ! !
