१०,७५५ मतांच्या फरकाने मिळवला विजय
मुंबई(दहिसर), दि. १६: राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. उमेदवारीवरून नाराजी, पक्षांतर्गत संघर्ष आणि कौटुंबिक राजकारण यामुळे काही प्रभाग विशेष चर्चेत राहिले. त्यामध्ये दहिसरमधील प्रभाग क्रमांक २ चा समावेश होता.
दहिसरमधील फेसबुक लाईव्ह खून प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या घोसाळकर कुटुंबात या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय मतभेद उघड झाले. तेजस्वी घोसाळकर यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करत दहिसर प्रभाग क्रमांक २ मधून उमेदवारी मिळवली होती. त्यामुळे या प्रभागातील लढतीकडे संपूर्ण मुंबईचं लक्ष लागलं होतं.
तेजस्वी घोसाळकर यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने त्यांच्या माजी मैत्रीण धनश्री कोलगे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, दहिसरमधील मतदारांनी भाजपच्या तेजस्वी घोसाळकर यांना स्पष्ट कौल देत मोठ्या मताधिक्याने विजयी केलं आहे.
मतमोजणीतील स्थिती
मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच तेजस्वी घोसाळकर आघाडीवर होत्या. दुसऱ्या फेरीअखेर त्यांना ११,९६४ मतं मिळाली होती, तर शिवसेना ठाकरे गटाच्या धनश्री कोलगे यांना ४,११५ मतं मिळाली होती. अंतिम निकालानुसार तेजस्वी घोसाळकर यांनी एकूण १६,४८४ मतं मिळवत १०,७५५ मतांच्या फरकाने विजय मिळवला. धनश्री कोलगे यांना ५,७२९ मतांवर समाधान मानावं लागलं.
निष्ठावंत विरुद्ध गद्दार अशी लढत?
निवडणुकीपूर्वी धनश्री कोलगे यांनी ही लढत “निष्ठावंत विरुद्ध गद्दार, टीव्हीवरील चेहरा विरुद्ध रस्त्यावर काम करणारा चेहरा, बाहेरचा उमेदवार विरुद्ध स्थानिक उमेदवार” अशी असल्याचं म्हटलं होतं. मात्र, निकालाने मतदारांचा कौल तेजस्वी घोसाळकर यांच्या बाजूने दिल्याचं स्पष्ट झालं.
धनश्री कोलगे कोण?
धनश्री कोलगे या युवासेना कार्यकारिणीच्या सदस्य असून दहिसर प्रभाग क्रमांक २ मधून शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार होत्या. प्रभागात शिवसेना कार्यकर्ती म्हणून त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत पक्षाने त्यांना उमेदवारी दिली होती. प्रचारादरम्यान माजी आमदार विनोद घोसाळकर यांचाही त्यांच्या प्रचारात सहभाग पाहायला मिळाला होता.
तेजस्वी घोसाळकर कोण?
तेजस्वी घोसाळकर या शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आहेत. २०१७ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत त्या शिवसेनेकडून विजयी झाल्या होत्या. त्या माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी असून माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत. फेब्रुवारी २०२४ मध्ये अभिषेक घोसाळकर यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर तेजस्वी घोसाळकर यांच्या राजकीय वाटचालीकडे अधिक लक्ष वेधलं गेलं.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळवली आणि दहिसर प्रभाग क्रमांक २ मधून दणदणीत विजय मिळवत आपली राजकीय ताकद सिद्ध केली आहे.
