भारतीय टपाल विभागातर्फे पुण्यातील गणेशोत्सवाला समर्पित “गणेशोत्सव – २०२५” ही विशेष टपाल मुद्रा (कॅन्सलेशन) प्रसिद्ध
पुणे, दि. ३: महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरा जपणारा पुण्यातील गणेशोत्सव हा संपूर्ण भारतात तसेच जगातही प्रसिद्ध आहे आणि त्यातही श्रीमंत दगडूशेट हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट यांचा गणेशोत्सव देखील प्रसिध्द आहे. गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्राची परंपरा संपूर्ण भारतात टपालाच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचवण्यासाठी टपाल विभागाच्या महाराष्ट्र आणि गोवा सर्कलच्या वतीने पुण्यातील गणेशोत्सवाला समर्पित असे “गणेशोत्सव – २०२५” या विषयावर विशेष टपाल मुद्रा (कॅन्सलेशन) आज जारी केली. छंदांचा राजा असलेल्या फिलाटेली, म्हणजेच टपाल तिकिटांचा संग्रह करणाऱ्यांसाठी याचे विशेष महत्व असते.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट च्या वतीने उभारण्यात आलेल्या भव्य गणेशोत्सव मंडपात अमिताभ सिंह, मुख्य पोस्टमास्तर जनरल महाराष्ट्र आणि गोवा सर्कल, मुंबई, अभिजीत बनसोडे – निदेशक डाक सेवा पुणे क्षेत्र, सुनील रसाने अध्यक्ष, श्रीमंत दगडूशेट सार्वजनिक गणपती ट्रस्ट, महेश सूर्यवंशी, खजीनदार, श्रीमंत दगडूशेट सार्वजनिक गणपती ट्रस्ट, डाक विभागाचे अधिकारी, कर्मचारी, फिलाटेलीस्ट आणि हजारो गणेश भक्तांच्या उपस्थितीत ही विशेष टपाल मुद्रा (कॅन्सलेशन) जारी करण्यात आली. हे विशेष कॅन्सलेशन पुण्यातील जनतेला आणि या उत्सवांचे हृदय आणि आत्मा असलेल्या गणेशोत्सव मंडळांना समर्पित आहे.
याप्रसंगी अमिताभ सिंह म्हणाले की आज भारतीय डाक विभागा तर्फे गणेशोत्सवाच्या पवित्र प्रसंगी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या मौलिक कार्याचा सन्मान करण्यासठी हे विशेष कॅन्सलेशन जारी करण्यात आले. ते पुढे म्हणाले की हे विशेष कॅन्सलेशन पुणे येथुन पाठवल्या जाणाऱ्या टपालावर छापले जाणार आहे. ह्याचे वैशिष्ठ्य म्हणजे यात गणेशाची एक प्रतिमा अधोरेखित करण्यात आलेली आहे. हे विशेष कॅन्सलेशन सुप्रसिद्ध हस्ताक्षर कलाकार, पद्मश्री पुरस्कार विजेते श्री अच्युत पालव यांनी बनवले आहे. त्यांनी सर्व गणेश भक्तांना डाक विभागातर्फे गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
