महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस; शेवटच्या क्षणापर्यंत इच्छुक उमेदवार राहणार गॅस वर
मुंबई/पुणे, दि. ३०: राज्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन आणि राजकीय पक्षांची तयारी जोरात सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्यामुळे राज्यभरात आज अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी झाली. स्थानिक गणितं लक्षात घेऊन वेगवेगळ्या पक्षांच्या आघाड्या बनत आहेत, तसंच अनेक नेते पक्षांतर करत आहेत.
मुंबईसाठी काँग्रेसने ८७ उमेदवारांची तर राष्ट्रवादी काँग्रेसने ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आज सात उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. काँग्रेससोबत निवडणूक लढवत असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने मंबईसाठी ६ उमेदवार आज जाहीर केले. तर महायुतीने रिपब्लिकन पक्षाला किमान १६ जागा द्याव्यात, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपामधे प्रवेश केला.
मनसेने आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म द्यायला आज सुरूवात केली. त्याआधी राज ठाकरे यांनी एका बैठकीत पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. युतीचा धर्म काटेकोर पाळायचा असून निवडणूक ताकदीने लढायची आहे, असा संदेश राज ठाकरे यांनी दिल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी वार्ताहरांना सांगितलं. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एक पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे. कोविड महामारीच्या काळात महाविकास आघाडीने केेलेल्या कामगिरीची माहिती यात दिली आहे.
ठाणे महानगरपालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याचं काँग्रेस नेते विक्रांत चव्हाण यांनी आज माध्यमांना सांगितलं. पिंपरी चिंचवडप्रमाणे पुण्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालचे पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहेत, अशी घोषणा अजित पवार यांनी काल केली. याला आमदार रोहित पवार यांनी आज दुजोरा दिला. दोन्ही पक्ष आपापल्या चिन्हांवर लढतील असं त्यांनी सांगितलं. दुसरीकडे पुण्यासाठी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे आणि वंचित बहुजन आघाडी हे एकत्र निवडणूक लढणार आहेत. पण पिंपरी चिंचवडमधे वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढणार आहे.
पुणे महापालिकेची निवडणूक भाजपा, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुती म्हणून लढवत असून मित्र पक्षांना सन्मानजनक जागा देण्यात येतील भाजपाचे गणेश बिडकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितलं. भारतीय जनता पक्षाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना डावलून पक्षाशी संबंधित नसलेल्यांना तिकीट दिल्याचा आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आज भाजपच्या पुणे शहर कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. यंदाच्या निवडणुकीत आरपीआयला सहा जागांवर उमेदवारी दिली आहे.
एमआयएम पक्षाने ठाणे महानगरपालिकेसाठी ५, तसंच वसई विरार महानगरपालिका निवडणुकीसाठी ३ उमेदवार जाहीर केले आहेत. आपला पक्ष भिवंडी निजामपूर तसंच तळोजा इथंही उमेदवार देणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी सांगितलं. नांदेडमधे एमआयएमने वीस जणांची पहिली यादी जाहीर केली आहे.
जळगावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ३८ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ३७ जागा लढवणार आहे. धुळे महानगरपालिकेत भाजप आणि शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. तर महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्ष एकत्रित लढणार आहेत.
सोलापुरात भाजपाबरोबर शिवसेनेची चर्चा निष्फळ ठरली असून तिथं राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याचं पक्ष प्रवक्ते सिद्धराम म्हेत्रे यांनी सांगितलं. दरम्यान, आज अर्ज दाखल करण्यासाठी विविध पक्षांच्या उमेदवारांनी निवडणूक कार्यालयात मोठी गर्दी केली होती. अमरावतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने २० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
नाशिकमधे उमेदवारी अर्ज भरायला आलेल्या उमेदवारांना अर्ज भरायला विलंब होत असल्याने काही काळ गोंधळ उडाला आणि काही काळ अर्ज भरायची प्रक्रिया थांबली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती पूर्ववत झाली.
Source – AIR
