म्हणून ‘या’ नेत्याने आपल्या नावातून ‘चौकीदार’ शब्द हटवला
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तिकिट न मिळाल्याने नाराज झालेले भाजप खासदार उदित राज यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याची घोषणा केली.

भाजपाने दिल्लीतील उत्तर पश्चिम मतदारसंघातून विद्यमान खासदार उदित राज यांना डावलून गायक हंसराज यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेले उदित राज यांनी बुधवारी थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. देशात दलितांसाठी आवाज उठवणे चुकीचे आहे का, असा प्रश्नही उदित राज यांनी विचारला आहे. उदित राज हे दलित समाजातील नेते आहे.
मी नेहमीच दलित समाजाच्या हितासाठी आवाज उठवतच राहणार, फक्त दलित असल्याने तुम्ही दलित नेते ठरत नाही, तुम्हाला दलित समाजाच्या हितासाठी लढावं लागतं, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
उदित राज यांनी ट्विट करून म्हटले होते की, मी तिकिटासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याशी बोलण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आले नाही. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आपल्या नावातून चौकीदार शब्द हटवला आहे.
