Chocolate
आजची रेसिपी : यम्मी..यम्मी..चॉकलेट रोल
आज आपण बनवणार आहोत चॉकलेट रोल. चॉकलेट म्हणजे लहान तसेच तरुण वर्गाचा आवडता खाऊ. याच
चॉकलेटपासून आपण तयार करणार आहोत मस्त यम्मी रोल. एखाद्या स्पेशल दिवशी हा यम्मी चॉकलेट रोल तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. या यम्मी चॉकलेट रोलसाठीचे साहित्य काय आहेत ते आपण पाहूया.
साहित्य :- बिस्किट्स 35 ते 40 तुकडे, कोको पावडर, कॉफी पावडर, अर्धा कप दूध, बटर दोन टेबलस्पून, कंडेन्स दूध 2 चमचे, पिठी साखर, वेलची पावडर अर्धा चमचा, खवलेलं खोबरं
कृती :
प्रथम बिस्किटाचे छोटे-छोटे तुकडे करून ते मिक्सरमधून बारिक करून घ्या. नंतर एका भांड्यात बिस्किटाचे वाटलेले मिश्रण काढून घ्या त्यामध्ये तयार बिस्किटांच्या पावडरमध्ये बटर कॉफी पावडर, कोको पावडर आणि पिठी साखर एकत्र करून घ्या. त्यामध्ये हळूहळू दूध एकत्र करा आणि जोपर्यंत बॅटर एखाद्या पिठाप्रमाणे नरम आणि चिकट होत नाही तोपर्यंत मळून घ्या. तयार मिश्रण जास्त घट्ट असू नये किंवा जास्त नरम असू नये.
एका भांड्यामध्ये सुकं खोबरं, पिठी साखर आणि वेलची पावडर एकत्र करा. या मिश्रणामध्ये दूध टाकून थिक पेस्ट होइपर्यंत एकत्र करा. गरजेप्रमाणे दूधाचा वापर करा. कारण जर हे मिश्रण कोरडं झालं तर रोलचा आकार नीट होणार नाही.
नंतर एक बटर पेपर घेऊन त्यावर थोडं बटर लावून घ्या. आता तयार केलेलं मिश्रण बटर पेपरवर ठेवा रोलरच्या मदतीने लाटून घ्या. तयार केलेलं नारळाचं मिश्रण चपातीवर ठेवा आणि सगळीकडे समान भागामध्ये पसरवून घ्या. त्यानंतर तुमच्या हातांनी थोडा दाब द्या. त्यामुळे मिश्रण सेट होण्यास मदत होइल.
आता बटर पेपरच्या सहाय्याने व्यवस्थित रोल करून घ्या. साधारणता एका तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवा त्यामुळे रोल व्यवस्थित सेट होण्यास मदत होइल. तासाभराने फ्रिजमधून बाहेर काढून लगेच गोल आकारामध्ये कापून घ्या. तुमचा चॉकलेट रोल तयार आहे.
