भारतात जन्मलेल्या चित्त्यांच्या बछड्यांची संख्या ३३ वर पोहोचली
कुनो(मध्यप्रदेश), दि. ९: केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज माहिती दिली की नामिबियातून आणलेल्या ज्वाला या चित्ता मादीने तिसऱ्यांदा बछड्यांना जन्म दिला असून तिने कुनो राष्ट्रीय उद्यानात पाच बछड्यांना जन्म दिला आहे.
X या समाज माध्यमावरील एका संदेशात मंत्री म्हणाले की या बछड्यांच्या जन्मामुळे, भारतात जन्मलेल्या आणि सध्या सुरक्षितपणे वाढत असलेल्या चित्त्यांच्या बछड्यांची संख्या ३३ वर पोहोचली आहे. भारतीय भूमीवर जन्मलेल्या चित्त्याच्या बछड्यांचा हा दहावा कळप असून भारताच्या चित्ता संवर्धनाच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे.
प्रोजेक्ट चित्तासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण असल्याचे यादव म्हणाले. ही कामगिरी पशुवैद्य, वनक्षेत्रीय कर्मचारी आणि प्रकल्पात कार्यरत असणाऱ्या सर्वांच्या अथक आणि समर्पित प्रयत्नांचे, कौशल्याचे तसेच वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. या बछड्यांच्या आगमनाने भारतातील चित्त्यांची एकूण संख्या ५३ वर पोचली असल्याचे त्यांनी सांगितले.
वन्यजीव संवर्धनासाठी हा एक ऐतिहासिक आणि हृदयस्पर्शी क्षण असल्याचे वर्णन करताना, ज्वाला आणि तिचे बछडे बलवान होतील आणि निरोगी वाढतील, परिणामी भारताच्या चित्ता संवर्धनाच्या कहाणीला आणखी मोठे यश मिळेल, अशी आशा मंत्र्यांनी व्यक्त केली.
अलीकडेच, दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या गामिनी या मादीने दुसऱ्यांदा बछड्यांना जन्म दिला असून यावेळी तिने चार बछड्यांना जन्म दिला. याशिवाय, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी, यादव यांनी बोत्सवानाहून आणलेल्या नऊ चित्त्यांना – ६ माद्या आणि ३ नर यांना मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानातील क्वारंटाइन आवारात सोडले. हे चित्ते सध्या पर्यावरणाशी जुळवून घेण्याच्या आणि आरोग्य निरीक्षणाच्या टप्प्यात आहेत. त्यानंतर त्यांना टप्प्याटप्प्याने मोठ्या वनक्षेत्रात सोडण्यात येणार आहे.
