चिनाब नदीवरील जगातल्या सर्वात उंच रेल्वे पुलाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
जम्मू-काश्मीर, दि. ६: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू-काश्मीर दौऱ्यात जगातला सर्वात उंच रेल्वे पूल असलेल्या चिनाब पुलाचं उद्घाटन केलं. तत्पूर्वी त्यांनी संपूर्ण पुलाची पाहणी केली. तसंच त्यांनी उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक आणि चिनाब पूल निर्मितीत सहभागी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. चिनाब नदीपासून ३५९ मीटर उंचीवर असलेला रेल्वे पूल हा जगातला सर्वात उंच रेल्वे कमानीवरचा पूल आहे. एक हजार ३१५ मीटर लांबीचा हा पूल स्टीलपासून तयार केला आहे. देशातला सर्वात उंचावरचा केबलवरचा पूल असलेल्या अंजी पुलाचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं.
प्रधानमंत्र्यांनी कटरा येथे श्री माता वैष्णोदेवी-श्रीनगर वंदे भारत गाडीला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर त्यांनी शालेय विद्यार्थ्यांबरोबर गाडीने प्रवास केला. या ठिकाणी होणाऱ्या जाहीर कार्यक्रमात ४६ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येत आहे.
