महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना नोटीस बजावत दोन आठवड्यांत या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना
पालघर, दि. २७: राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी), प्रसार माध्यमातील एका वृत्ताची स्वतःहून दखल घेतली आहे. या वृत्तानुसार २१ ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील तारापूर येथील बोईसर औद्योगिक वसाहतीत असलेल्या एका औषध निर्माण कारखान्यात नायट्रोजन वायूगळती झाली होती. या घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाला आणि दोघे जखमी झाले. घटनेच्या वेळी कारखान्यात ३६ कामगार उपस्थित होते.
आयोगाने असे निरीक्षण नोंदवले आहे की, जर वृत्तातील माहिती खरी असेल तर ती मानवी हक्कांच्या गंभीर उल्लंघनाचा प्रश्न उपस्थित करते. त्यामुळे, आयोगाने महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांना नोटीस बजावली आहे आणि दोन आठवड्यांच्या आत या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागितला आहे. अहवालात चौकशीची सद्यस्थिती, मृतांच्या नातेवाईकांना देण्यात आलेली नुकसान भरपाई, (जर दिली असेल तर) आणि जखमी कामगारांच्या प्रकृती बाबतची माहिती समाविष्ट असणे अपेक्षित आहे. २२ ऑगस्ट २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या माध्यमांतील वृत्तानुसार, जिल्हा प्रशासनाने वायू गळतीचे कारण निश्चित करण्यासाठी आणि सुरक्षा व्यवस्थेमध्ये काही त्रुटी होत्या का याचे मूल्यांकन करण्यासाठी घटनेची चौकशी सुरू केली आहे.
