मनसे तर्फे पहिला एबी फॉर्म मिळाला यशवंत किल्लेदार यांना - 1
भाजप व शिंदे सेनेचा प्रत्येकी एक उमेदवार बाद; तर कल्याण-डोंबिवली, पनवेल व धुळे महापालिकेत ५ उमेदवार बिनविरोध
मुंबई, दि. ३१: मुंबई महानगरपालिकेच्या २०२६ च्या निवडणुकीच्या प्रक्रियेत अर्ज छाननीनंतर अनपेक्षित राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर अवघ्या काही तासांतच सत्ताधारी महायुतीसाठी अडचणीची स्थिती निर्माण झाली आहे. मुंबईतील दोन प्रभागांमध्ये महायुतीचा एकही उमेदवार वैध ठरलेला नसल्याने या प्रभागांत थेट निवडणूक लढतच होणार नाही.
महानगरपालिकेतील वॉर्ड क्रमांक २११ मध्ये एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना उमेदवाराचा अर्ज आवश्यक कागदपत्रांतील त्रुटींमुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळला. तर वॉर्ड क्रमांक २१२ मध्ये भारतीय जनता पक्षला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या उमेदवार मंदाकिनी खामकर या अर्ज सादर करण्यासाठी निर्धारित वेळेपेक्षा काही मिनिटे उशिरा पोहोचल्याने त्यांची उमेदवारी अमान्य ठरवण्यात आली. एबी फॉर्म मिळूनही अंतिम क्षणी झालेल्या विलंबामुळे भाजप या वॉर्डमधून बाहेर पडला आहे.
या प्रभागात ठाकरे बंधूंच्या आघाडीने मनसेच्या श्रावणी हळदणकर यांना संधी दिली आहे. त्यांच्याविरोधात अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी तसेच काँग्रेससह इतर पक्षांचे उमेदवार मैदानात असले तरी, विरोधकांच्या तुलनेत श्रावणी हळदणकर यांची स्थिती मजबूत मानली जात आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्रित राजकीय पाठबळामुळे या वॉर्डमध्ये मनसेच्या विजयाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबईत दोन प्रभागांमध्ये अपयश आले असले तरी राज्यातील इतर महानगरपालिकांमध्ये भाजपसाठी चित्र वेगळे आहे. काही ठिकाणी मतदान होण्याआधीच पक्षाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत रेखा चौधरी, आसावरी नवरे व रंजना पेणकर या तिघींना कोणताही विरोधक न मिळाल्याने त्यांचा विजय निश्चित झाला आहे. प्रभाग १८ ‘अ’ मधून रेखा राजन चौधरी, पॅनल क्रमांक २६ (क) मधून आसावरी केदार नवरे तर प्रभाग क्र. २६ (ब) मधून रंजना मितेश पेणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
याशिवाय पनवेल महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक १८ (ब) मधून नितीन पाटील यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. धुळे महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक १ मधून उज्ज्वला भोसले या भाजपच्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. त्यामुळे एका बाजूला मुंबईत अडथळे वाढत असतानाच, राज्याच्या इतर भागांत भाजपने सुरुवातीची आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे.
