प्रचार कालावधी संपल्यानंतर घरोघर प्रचारास परवानगी देण्यावरून व्यक्त केली नाराजी
मुंबई, दि. १४ : मुंबई महानगरपालिकेसाठी उद्या, १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट दिली. या भेटीनंतर दोन्ही नेते मुंबादेवी मंदिरात दर्शनासाठी रवाना होणार आहेत. याआधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधत मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भातील काही निर्णयांवर आक्षेप नोंदवला.
प्रचार कालावधी संपल्यानंतर घरोघर प्रचारास परवानगी
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचाराचा कालावधी १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता संपला आहे. मात्र, प्रचार कालावधी संपल्यानंतरही उमेदवारांना घरोघर प्रचार करण्यास परवानगी देण्यात आल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्याचे समोर आले आहे.
या निर्णयावर राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये मतदानाच्या आधीच्या दिवशी प्रचारास बंदी असायची, मात्र ही प्रथा यावेळी मोडण्यात आल्याचा त्यांनी उल्लेख केला.
निवडणूक आयोगावर आरोप
राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना निवडणूक आयोग सरकारच्या सोयीप्रमाणे निर्णय घेत असल्याचा आरोप केला. प्रचार साहित्य वाटपावर निर्बंध असताना पैशांचे वाटप रोखले जात नाही, असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. तसेच, सर्व पदाधिकाऱ्यांना आपापल्या भागात लक्ष ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
‘पाडू’ PADU मशीनबाबत प्रश्न उपस्थित
राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाने ‘PADU’ (Printing Auxiliary Display Unit) नावाचे नवीन मशीन आणल्याबाबतही आक्षेप नोंदवला. ईव्हीएममध्ये तांत्रिक अडचण आल्यास हे मशीन वापरण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली असली, तरी याबाबत आधी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती, असे त्यांनी सांगितले. ईव्हीएम प्रणालीमध्ये नवीन यंत्र जोडण्यासंदर्भात राजकीय पक्षांना किंवा उमेदवारांना माहिती देणे अपेक्षित होते, मात्र तसे न झाल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग यांना पत्र लिहिल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
