राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी माघारीअखेर मुंबईत १,७२९ उमेदवार रिंगणात
मुंबई, दि. ३: राज्यातल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत काल संपली. आज निवडणूक चिन्हांचं वाटप झाल्यानंतर, अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार आहे. येत्या १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. काल अनेक प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले, तर अनेक ठिकाणी बंडखोरी कायम राहिली आहे. सर्वच राजकीय पक्षात बंडखोरी झाली असून त्याचा फटका बसू नये म्हणून, अर्ज मागं घेण्यासाठी बंडखोरांची समजूत काढल्यानंतर, बंडखोरांनी अर्ज मागे घेतले. परिणामी काही उमेदवार बिनविरोध निवडले गेले.
राज्यात महायुतीचे एकंदर ६८ उमेदवार बिनविरोध निवडले गेल्याचं भाजपाने म्हटलं आहे. यात ४४ उमेदवार भाजपाचे तर २२ शिवसेनेचे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे २ उमेदवार बिनविरोध आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी १ हजार ७२९ उमेदवार नशीब आजमावत आहेत. ४५३ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.
ठाणे महानगरपालिकेत १३१ जागांसाठी २६९ उमेदवारांनी नामांकन मागे घेतल्यानं ६४९ उमेदवार रिंगणात उरले आहेत. पुण्यात माघारीच्या मुदतीत ९६९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने महानगरपालिकेच्या १६५ जागांसाठी एकूण एक हजार १६५ उमेदवार रिंगणात उरले आहेत. अर्ज माघारीनंतर भाजपाचे २ उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत. छत्रपती संभाजीनगरमधे ५५४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं ११५ जागांसाठी ८५९ उमेदवार रिंगणात उरले आहेत. लातूरमधे ३५९ उमेदवार मैदानात आहेत.
