भाजपने संसदेत विरोधी बाकांवर बसवलेली शिवसेना शेतकरी प्रश्नी झाली आणखी आक्रमक
नवी दिल्ली: भाजपने शिवसेनेला एनडीए मधून बाहेर काढल्यानंतर शिवसेना खासदारांची बसण्याची व्यवस्था विरोधी बाकावर केली. यामुळे आधीच दुखावलेल्या सेनेने आज भाजपला विरोधीपक्षाचा इंगा दाखवला. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना खासदारांनी शेतकरी नुकसानभरपाई प्रश्नी आक्रमक पवित्रा घेत हल्ला चढवला.
राज्यात अवकाळी पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना पुरेशी नुकसानभरपाई मिळालेली नाही. सरकारकडून अधिक मदत मिळावी या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव मांडला व यानंतर सभात्याग केला. राज्यपालांकडून शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम कमी असून ती २५,००० करावी अशी मागणी यावेळी शिवसेनेने पंतप्रधान मोदींकडे केली.
यावेळी महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून अवकाळी पावसामुळे उध्वस्त झालेल्या शेतकरी बांधवांना, बागायतदारांना आधार देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी शिवसेनेच्या खासदारांनी यावेळी केली.
