शिवसेनेच्या जुन्नर येथील जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांची पक्षातून अखेर हकालपट्टी
जुन्नर: शिवसेनेच्या जुन्नरमधील नेत्या व जिल्हा परिषद गटनेत्या आशा बुचके यांची पक्षविरोधी कारवाईमुळे पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. याच बरोबर पुणे जिल्हाप्रमुख राम गावडे यांनाही पदच्युत करण्यात आलेले आहे. जिल्हा परिषद सदस्य माऊली कटके हे आता नवे शिवसेना जिल्हाप्रमुख असणार आहेत.
लोकसभेपुर्वी मनसेचे एकमेव आमदार राहिलेले शरद सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यापासूनच आशा बुचके यांची धुसफूस सुरू झाली. लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील यांचा ४६,००० मतांनी पराभव झाला. त्यातही जुन्नर मतदार संघातून अपेक्षित आघाडी मिळू शकली नाही. यामागे आशा बुचके असल्याची दबक्यात चर्चा चालू होती. अखेर आज त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
आशा बुचके यांनी जुन्नर मतदारसंघातून २००९ आणि २०१४ ची विधानसभा निवडणूक शिवसेनेकडून लढवली होती. २०१४ साली जुन्नर चे विद्यमान आमदार शरद यांनी आशा बुचके यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. पण आता आशा बुचके यांच्या हकालपट्टी नंतर शरद सोनवणे यांचा शिवसेनेच्या अधिकृत तिकिटावर येति विधानसभेची निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
