दरांबाबतच्या अफवांवर शासनाचे मोठे स्पष्टीकरण
मुंबई, दि. १०: राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये तपासणी आणि उपचार पूर्वीप्रमाणेच पूर्णपणे विनामूल्य (Free) राहणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून उपचारासाठी पैसे मोजावे लागणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते, मात्र यावर महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने अधिकृत स्पष्टीकरण देऊन सर्व संभ्रम दूर केला आहे.
नेमका गोंधळ कशामुळे झाला?
सार्वजनिक आरोग्य विभागाने १६ जानेवारी २०२६ रोजी ‘नागरिकांची सनद’ (Citizen’s Charter) प्रसिद्ध केली होती. या सनदेमधील परिशिष्ट-३ मध्ये आरोग्य सेवांसाठी काही दर नमूद करण्यात आले होते. हे दर प्रत्यक्षात ६ जून २०१५ च्या जुन्या शासन निर्णयातील होते, जे अनवधानाने (चुकीने) या नवीन दस्तऐवजात समाविष्ट झाले होते. यामुळे नागरिकांमध्ये अशी भावना निर्माण झाली होती की, आता शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी पुन्हा शुल्क आकारले जाणार आहे. प्रत्यक्षात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली शासकीय रुग्णालयामध्ये तपासणी व उपचार निःशुल्क करण्यात आलेले असल्याने नागरिकांच्या सनदेमधील परीशिष्ठ-तीन हे ९ फेब्रुवारी २०२६ शुध्दीपत्रकान्वये वगळण्यात आले आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.
