उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीहून ठाण्यात पोहोचताच मध्यरात्री २ वाजता झाला पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम
अकोला/ठाणे, दि. १८ : राज्यातील राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौऱ्यानंतर परतताच शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. अकोला महानगरपालिकेतील ठाकरे गटाचे चार नगरसेवक शिंदे गटात दाखल झाल्याने स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीत राज्यातील विविध प्रशासकीय व राजकीय विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. सुमारे दीड तास चाललेल्या या बैठकीनंतर शिंदे मंगळवारी उशीरा रात्री राज्यात परतले. ठाण्यात आगमनानंतर लगेचच अकोल्यातील ठाकरे गटातील पदाधिकारी व नगरसेवकांनी त्यांची भेट घेतली.
ठाण्यातील नंदनवन या निवासस्थानी पहाटेच्या सुमारास झालेल्या या भेटीत ठाकरे गटाचे चार नगरसेवक तसेच जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांनी शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला. या प्रवेशामुळे अकोला महानगरपालिकेतील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
शिंदे गटात प्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये मनोज पाटील, सागर भारुका, सोनाली सरोदे आणि सुरेखा काळे यांचा समावेश आहे. याशिवाय ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांनीही शिंदे गटाचा भगवा स्वीकारला. विशेष म्हणजे सुरेखा काळे या नुकत्याच झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून चर्चेत होत्या.
या घडामोडीनंतर अकोला महानगरपालिकेत ठाकरे गटाचे केवळ दोन नगरसेवक उरले असून, स्थानिक पातळीवरील संघटनात्मक ताकद कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात अकोल्यातील सत्तासमीकरणांवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या राजकीय घडामोडींमुळे ठाकरे गटात खळबळ उडाली असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा इतर वरिष्ठ नेते यावर काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीत अशा हालचालींना अधिक वेग येण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
