अजित पवारांचा राजीनामा म्हणजे नव्या राजकारणाची नांदी तर नाही ?
मुंबई: कालचा दिवस हा राष्ट्रवादी साठी घडामोडीयुक्त होता. काल राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांना शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी दुपारी २ वाजता ईडी च्या मुंबईतील कार्यालयात पाचारण करण्यात येणार होते पण तत्पूर्वीच ‘ईडी’ तर्फे एक मेल त्यांना आला ज्यात नमूद केले होते की आज शरद पवार यांनी ईडी च्या कार्यालयात येण्याची गरज नाही. भविष्यात गरज भासल्यास त्यांना चौकशी साठी बोलावण्यात येऊ शकते. यानंतर मग लगेच राष्ट्रवादी तर्फे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मोदी सरकारवर व भाजपवर निशाणा साधला.
सारं काही शांत होतं न होत तोच दुसरा बॉम्ब पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी तडकाफडकी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. यानंतर माध्यमांनी अजित पवार यांना संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला त्याला कारणही तसेच होते. त्यांनी राजीनामा का दिला याचं कोडं ते किंवा पक्षाचे अध्यक्ष शरद पावरच देऊ शकत होते. तो पर्यंत बऱ्याच चर्चा रंगल्या; अजित पवार नाराज असल्याकारणाने नवीन पक्ष स्थापन करणार, पवार कुटुंबात गृहकलह इत्यादी..इत्यादी. पण यानंतर शरद पवार यांनी एक पत्रकार परिषद घेत आपणही अजित पवारांच्या राजीनाम्याबाबत अनभिज्ञ असल्याचे जाहीर केले. यावेळी ते म्हणाले की, “त्यांचा स्वभाव हाती घेतलेलं काम धडाडीने पूर्ण करण्याचा व एखादी गोष्ट पटली नाही तर त्यासंबंधी रोखठोक भूमिका घेण्याचा आहे. माझं नाव आल्याने त्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. एक्स्ट्रीम निर्णयामागे हे कारण असावं. कुटुंबप्रमुख म्हणून मी जबाबदारीने जरूर यात लक्ष घालणार आहे.” पुढे ते अधिक स्पष्टीकरण देत ते म्हणाले की, “त्यांनी अध्यक्षांना हा राजीनामा मंजूर करावा अशी विनंती केल्याचे समजते. त्याप्रमाणे त्यांनी तो मंजूर केला. राजीनामा देण्याआधी किंवा दिल्याच्या नंतर त्यांनी संपर्क साधलेला नाही. मी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण माझा काही त्यांच्या संपर्क होऊ शकलेला नाही.”
एकूणच आद्यप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने चित्र स्पष्ट करण्यात आले नसल्याने कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात आहेत. कारण शरद पवार यांनी म्हटल्या प्रमाणे जर अजित पवार हे राजकीय संन्यास घेण्याच्या मार्गावर असतील तर मग पक्षाची धुरा कोण सांभाळणार हा अनुत्तरित प्रश्न सध्या साऱ्यांनाच पडला आहे. कारण अजित पवार यांच्या धडाडीच्या स्वभावाला मानणारा मोठा गट पक्षात आहे. अजित पवार यांची कार्यशैली ही रोखठोक भूमिका घेण्याची राहिली आहे. ती काहीशी शरद पवारांच्या स्वभावाच्या विरुद्ध आहे. पण पक्ष चालवण्यासाठी लागणार कसब हे अजित पवारांच्या अंगी आहे असं त्यांचे राजकीय विरोधकही कबुल करतात. तूर्तास अजित पवारांच्या प्रतिक्रियेची वाट पाहणे हेच उत्तम.
