गाडीची काच बुलेटप्रूफ व सोबतीला ‘वाय’ दर्जाची सुरक्षा तरीही झाला खुनी हल्ला
मुंबई, दि. १३: माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची काल मुंबईत निघृणरीत्या हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आणि आमदार झिशान सिद्दीकी यांच्या वांद्रे इथल्या कार्यालयाबाहेर बाबा यांच्यावर तीन अज्ञातांनी गोळीबार केला. त्यांना एकूण तीन गोळ्या झाडल्या गेल्या. वांद्रे येथील लीलावती इस्पितळात दाखल केले असता काही वेळाने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केली. दरम्यान, घटनास्थळावरून आरोपी पळून जात असताना तेथे उपस्थित जमावाने आरोपींना पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले. या हत्या प्रकरणाचा तपास आज सकाळपासून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सुरू केला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, ताब्यातील दोन आरोपींची चौकशी सुरू आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचं कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींची नाव अनुक्रमे गुरमेल बलजित सिंग, हरियाणा(२३ वर्षे) व धर्मराज कश्यप, उत्तर प्रदेश (१९ वर्षे) आहे. तर एक फरार आरोपी ज्याचे शेवटचे लोकेशन पनवेल रेल्वे स्टेशन दिसले त्याचे नाव शिवानंद आहे. हे तिघेही आरोपी घटनास्थळी रिक्षाने आले होते. या हत्येची जबाबदारी एका फेसबुक पोस्ट मार्फत कथितरीत्या बिष्णोई टोळी ने घेतल्याचे कळते. ६६ वर्षीय बाबा सिद्दीकी यांची रेंज रोव्हर नावाची गाडी बुलेटप्रूफ होती. परंतू त्यातून गोळी आत शिरली आहे. त्याच सोबत त्यांना मागील काही दिवसांपासून वाय दर्जाची सुरक्षा राज्य सरकारच्या वतीने प्रदान करण्यात आली होती तरीही त्यांच्यावर खुनी हल्ला झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
एका राजकीय नेत्याची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे, असा आरोप करत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
सदर घटना घडल्यानंतर राज्यातील प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या महाविकास आघाडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट देवेंद्र फडणवीस याच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ते म्हणाले कि, “राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे. बाबा सिद्दिकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो.” शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका करत सरकार बरखास्त करण्याची मागणी केली.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कोणतीही टोळी पुन्हा सक्रीय होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना दिल्या आहेत. दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यानुसार सिद्दिकी यांच्या पार्थिवावर मरीन लाईन्स इथल्या बडा कब्रस्तान दफनभूमीत शासकीय इतमामानं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वत्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
