‘आप’ प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा कॉंग्रेस भाजपसोबतच्या त्रिशंकू लढतीत पराभव
नवी दिल्ली, दि. ८: दिल्ली विधानसभा २०२५ निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून भारतीय जनता पक्षाने अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टी ला धोबीपछाड देत दिल्लीची सत्ता काबीज केली आहे. तब्बल २७ वर्षांच्या प्रदीर्घ विरामानंतर भाजप सत्तेत परतला असून भारतीय जनता पक्षाने ४८ तर आम आदमी पक्षाने २२ जागांवर विजय मिळवला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकला आम आदमी पक्षासाठी धक्कादायक असेच म्हणावे लागतील कारण आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन, दुष्यंत गौतम आणि हारून युसूफ यांसारख्या वरिष्ठ नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. कॉंग्रेसला या निवडणुकीत एकही जागा जिंकता आलेली नाही.
दिल्लीचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली मतदारसंघात झालेल्या तिरंगी लढतीत मोठा पराभव झाला असून, ते भाजपचे परवेश वर्मा यांच्याकडून ४,०८९ मतांनी पराभूत झाले. तर माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना जंगपुरा मतदारसंघात भाजपचे तरविंदर सिंग मारवाह यांच्याकडून ६७५ मतांनी पराभव पत्करावा लागला. मारवाह यांनी ३८,८५९ मते मिळवून मतदारसंघात विजयाचा दावा केला. दुसऱ्या बाजूला दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी सिंह यांनी भाजपच्या रमेश बिधुडी यांचा ३५२१ मतांनी पराभव करत विजयश्री खेचून आणली.
