महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडला
मुंबई: महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडला. राज्याचा विकास दर ५ पूर्णांक ७ दशांश टक्के राहील, तर राज्याच्या स्थूल उत्पन्नात २०१८ – १९ या वर्षाच्या तुलनेत २ लाख ४५ हजार ७९१ कोटी रुपयांची वाढ होण्याची अपेक्षा या अहवालातून व्यक्त केली आहे.
उद्योग क्षेत्र वाढीचा दर ३ पूर्णांक ३ दशांश, तर सेवा क्षेत्र वाढीचा ७ पूर्णांक ६ दशांश टक्के राहील असंही या अहवालात म्हटलं आहे. कृषी आणि संलग्न क्षेत्राच्या वाढीचा दर ३ पूर्णांक १ दशांश टक्के राहील, खरिप पीकांमध्ये तृणधान्यांचं उत्पादन ९ टक्क्यांनी , कडधान्याचं ३ टक्क्यांनी , तेलबियांचं एका टक्क्यानं आणि कापसाचं उत्पादन २४ टक्क्यांनी वाढेल असा अंदाजही अहवालात मांडला आहे.
रब्बी पिकांमध्ये तृणधान्याच्या उत्पादनात ४३ आणि कडधान्यांच्या उत्पादनात २३ टक्क्यांची वाढ होईल, फलोत्पादन क्षेत्रात २४२ पूर्णांक ७१ शतांश लाख मेट्रिक टन उत्पादन मिळेल, तर उसाच्या उत्पन्नात ३६ टक्क्यांची आणि रब्बी पीकांतल्या तेलबीयांच्या उत्पादनात २४ टक्क्यांची घट होण्याचा अंदाज या अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे.
