Food Raw Diet
आयुर्वेद कुतूहल
आहार भाग ३
आजचा हा भाग आपण आपल्या घरात सामान्यतः बनणाऱ्या पदार्थांच्या गुणांविषयी जाणून घेण्यासाठी लिहिला आहे. आपल्या घरात आपण रोज जेवतो पण आपल्याला त्या पदार्थावर भाजणे, शिजवणे, फोडणी देणे ह्या संस्कारांमुळे होणाऱ्या गु णबदलां बाबत माहिती नसते म्हणूनच हा छोटासा प्रयत्न. जेणेकरून जेवण बनवताना ह्याचा विचार होईल व त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहील .
अन्नसंस्कारांचे सामान्य गुण –
१. दुधात बनवलेले पदार्थ शरीराला बल देणारे, दाह कमी करणारे, रुचिकर, शरीराला पुष्ट करणारे असतात.
उदा. – खीर, रबडी, इ.
२. घृतपुर (घेवर, मालपुआ) –
दुधात बनवून तुपात तळलेले पदार्थ पचायला जड, वजन वाढवणारे असतात.
३. गौडीका – गुळापासून बनवलेले पदार्थ शरीराला पुष्ट करतात, पचायला मदत करतात.
४. पूप (पोहे) – पचायला जड असतात.
५. मोदक (लाडु, पेढे) – पचायला जड असतात.
६. सामित – गव्हाच्या पिठापासून बनवलेले पदार्थ रुचिकर व पथ्यकर असतात.
७. पैष्टीक – तांदळाच्या पिठापासून बनवलेले पदार्थ हे बलकारक, पचायला जड असतात.
८. कडधान्य – हे पदार्थ हलके ,मलबद्धता करणारे असतात.
म्हणूनच कडधान्य बनवताना त्यात कांदा, लसूण, खोबरे हि वात कमी करणारी द्रव्ये घालतात.
९. विरुढीकृत पदार्थ (मोड आलेले पदार्थ) – हे पदार्थ पचायला जड, जळजळ-मळमळ उत्पन्न करणारे, रुक्ष व डोळ्यांसाठी अहितकर असतात.
त्यामुळे कडधान्याना मोड आणताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा ज्यांना मलबद्धता, आम्लपित्त ह्यांसारखे पचनाचे विकार असतील त्यांनी मोड आलेले पदार्थ खाताना विचार करावा. आंबवून केलेले पदार्थ उदा. – इडली, डोसा, ढोकळा ह्यांचे गुणधर्म हि साधारण असेच असतात. बेकरी प्रॉडक्ट्स म्हणजे ब्रेड, बिस्कीट हे देखील ह्यात मोडतात.
१०. उडीद व त्याचे पदार्थ – हे बलकारक जरी असले तरी पचायला जड व मल वाढवणारे असतात.
११. कुर्चिका विकृत पदार्थ – फाटलेल्या दुधापासून बनवलेले पदार्थ हे पचायला जड व मेद वाढवणारे असतात.
१२. घृतपाचित पदार्थ – तुपात बनवलेले पदार्थ हे रुचिकर, बलवर्धक, दृष्टीला हितकर असतात. फक्त त्याचा अतिरेक होऊ नये.
१३. तैल पाचीत पदार्थ – तेलात तळलेले पदार्थ हे विदाह करणारे, पचायला जड, दृष्टी व त्वचेला अहितकर असतात.
पचनाचे विकार, आम्लपित्त असणाऱ्यानी हे पदार्थ खाताना विचार करावा.
१४. उसाच्या रसापासून बनवलेले पदार्थ हे बलवर्धक व पचायला जड असतात फक्त गुळाची काकवी हि शरीराला हानिकारक असते. तिचे सेवन हे विशिष्ट काळात मर्यादित मात्रेत व पचन शक्ती चांगली असणाऱ्या व्यक्तीने करावे.
तीच गोष्ट सिरका ह्या आंबावलेल्या गुळाच्या काकावीस लागू पडते.
१५. मांसापासून बनवलेले पदार्थ हे बलवर्धक व पचायला जड असतात. (सद्य परिस्थितीत मिळणारे कोंबडीचे मांस व अंडी हि विविध Injections युक्त असल्यामुळे ते मांस शरीरास योग्य नाही.)
१६ कुळीथापासून बनवलेले पदार्थ मलाला पातळ करणारे असतात.
१७. चण्यापासून बनलेले सूप हे सर्दी खोकला ह्यात लाभकारक आहे तसेच वात वाढवणारे आहे म्हणून ह्यास तूप,लसूण,मिरे अशा द्रव्यांची जोड द्यावी.
१८. साळीच्या लाह्यांचे सूप हे पचायला हलके, शरीराला तृप्त करणारे, उलटी अथवा अतिसार विकारात आहार म्हणून लाभदायक आहे.
१९ मांसरस – मटणाचे सूप हे तृप्ती दायक, बल वाढवणारे आहे.
२०. मुगाचे सूप (मोड न आलेले) – भूक वाढवणारे, आजारी व्यक्ती व डोळ्यांसाठी हितकर आहे.
२१. मसूर चे सूप डाळिंब व मनुक्याच्या रस सोबत तयार केले असता, अग्निदीपक, पचायला हलके, मलबद्ध करणारे आहे.
२२. कलाय म्हणजे मटार हे वातकारक आहेत.
२३. मण्ड व पेया – तांदळाची पेज व त्यावरचे पाणी हे पथ्यकर, भूक वाढवणारे, पाचन करणारे, पोट साफ करणारे, मूत्रशोधक आहे.
२४. पालेभाज्या – पालेभाज्या पाण्यात धुवून पिळून घ्याव्यात त्या आरोग्यासाठी हितकर आहे.
२५. भाजलेले पदार्थ – खापर अथवा कोळसे ह्यांवर भाजलेला पदार्थ हा पचायला हलका होतो ह्यामुळेच पचायला जड असणारे पदार्थ जर भाजून घेतले तर ते हलके होतात
जसे नवीन तांदूळ हे पचायला जड असतात परंतु ते भाजले कि हलके होतात, अथवा भाजलेले मांस हे तळलेल्या मांसापेक्षा पचायला हलके असते.
२६. मासे – मासे हे बलवर्धक असतात, समुद्रातील मासे हे नदीतील माश्यांपेक्षा पचायला अधिक जड असतात, तसेच पावसाळ्यात म्हणजेच आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन ह्या महिन्यांमध्ये मासे खाणे आयुर्वेदाने व्यर्ज सांगितले आहे.
आपल्या स्वयंपाक घरात बनणाऱ्या आहाराचे साधारण गुण आपण पाहिले, जेणेकरून आहार बनवताना व घेताना ह्याचा विचार व्हावा. पुढल्या लेखात आपण आहारातील सहा रस त्यांची लक्षणे, उपयोगिता व अती सेवनाने होणारी हानी ह्यावर चर्चा करू, तोपर्यंत
आयुष्य जगा आयुर्वेदा संगे ।।
वैद्य शार्दुल चव्हाण
एम. डी. आयुर्वेद
9987925720
(Disclaimer: सदर लेखातील मते हि लेखक/लेखिकेची स्वतःची मते आहेत. न्युज पोर्टल फक्त एक माध्यम आहे.)
