संजय राऊत भेटणार राज्यपालांना; राज्यातील परिस्थिती संदर्भात शिवसेनेची भूमिका काय ते सांगणार
मुंबई: आज सकाळी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांनी शिवसेनेची पुढील रणनीती कशी असेल या बाबत इशारा दिला. आज सायंकाळी ५ वाजता शिवसेना नेते खासदार संजय राऊत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेणार आहेत.
या नियोजित भेटीबाबत स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, “ही भेट सदिच्छा भेट असून कुणी या भेटीकडे राजकीय भेट म्हणून पाहू नका”. पुढे ते म्हणाले की, “आज आपण सन्माननीय राज्यपालांची वेळ घेतली आहे. ही एक सदिच्छा भेट आहे. राज्यपाल हे राज्याचे प्रमुख, पालक असतात. विशेश म्हणजे महाराष्ट्राला लाभलेले राज्यपाल हे एका राज्याचे मुख्यमंत्री तसेच केंद्रात मंत्री होते. त्यांना दोन्ही सभागृहातील कामकाजाची माहिती आहे. ते अत्यंत अनुभवी असून आम्ही त्यांच्यासोबत काम केलं आहे, मार्गदर्शन घेतलं आहे. आज त्यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेऊ, असं त्यांनी सांगितलं. राज्यपालांशी भेटल्यावर अनेक विषयांवर चर्चा तर होणारच. राज्यातील परिस्थिती संदर्भात शिवसेनेची भूमिका काय ते देखील सांगू, असेही ते म्हणाले.
आज राज्यपाल भेटीनंतर संजय राऊत काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे लाक्षणिय ठरेल.
