शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत हुसेन दलवाई यांची सोनिया गांधी यांना पत्राद्वारे विनंती
मुंबई: शिवसेना-भाजप मधील कलगीतुऱ्यात काँग्रेसनेही उडी मारली असून काँग्रेस चे काही नेते शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा द्यावा या मताचे आहेत तर काही नेते शिवसेनेला असा कोणत्याही प्रकारचा पाठिंबा देऊ नये असे मत मांडत आहेत.
काँग्रेस चे राज्यातील ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस ने शिवसेनेला पाठिंबा द्यावा यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी शिवसेनेने काँग्रेसच्या राजवटीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने कशा प्रकारे काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीची मदत केली याचे स्मरण केले आहे. या निवडणुकांत शिवसेनेने आधी प्रतिभा पाटील आणि नंतर प्रणब मुखर्जी यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पाठिंबा दिला होता. ते पुढे या पत्रात लिहितात की शिवसेना आणि भाजपचं राजकारण निराळं आहे. शिवसेना आता सर्वसमावेशक झाली असून भाजपच्या राजकारणाला जातीयतावादाची गडद किनार आहे. त्यामुळे जर शिवसेनेकडून सत्ता स्थापनेबाबत काही प्रस्ताव आला तर त्याचा स्वीकार करावा.
हुसेन दलवाई हे जरी शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या पक्षात असले तरी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी खासदार संजय निरुपम हे मात्र अशा कोणत्याही प्रस्तावाच्या विरोधात आहेत.
